Pune Ring Road : पुणे अर्थातच शिक्षणाचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, प्रशासकीय अधिकारी घडवणारी भूमी. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर वाहतूक कोंडी साठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. शहरातील वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगारांच्या संध्या आणि परिणामी वाढणारी वर्दळ यामुळे ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गहन बनत चालली आहे.
अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन प्रशासनाच्या माध्यमातून तयारी जोरात सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या स्थितीला पुणे रिंग रोडचे भूसंपादन सुरू असून येत्या काही वर्षात पुणे रिंग रोड कार्यान्वित होईल आणि वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
अशातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणखी एक नवीन मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. पुणे रिंग रोड व्यतिरिक्त आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात उन्नत मार्ग विकसित केले जाणार आहेत. यासाठी महामार्ग प्राधिकरण जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा खर्च देखील करणार आहे.
नाशिक फाटा ते खेड, तळेगाव ते चाकण, हडपसर ते दिवे घाट आणि वाघोली ते शिरूर या चार मार्गांवर उन्नत मार्ग विकसित करण्याचा प्लॅन शासनाचा असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चारी उन्नत रस्त्यांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहे. या उन्नत मार्गांची केवळ घोषणा झाली असं नाही तर गडकरी यांनी या मार्गांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती देखील दिली आहे.
असे असणार उन्नत मार्ग
खरं पाहता, नाशिक फाटा ते खेड यादरम्यान मोशी, चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. अशा परिस्थितीत या ठिकाणी प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे नासिक फाटा ते खेड या दरम्यान 29 किलोमीटरचा उन्नत रस्ता तयार केला जाणार आहे. यासाठी जवळपास 8000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
यासोबतच तळेगाव ते चाकण दरम्यान 54 किलोमीटरचा उन्नत रस्ता बांधला जाणारा असून यासाठी तब्बल 11000 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.
हडपसर ते दिवे घाट दरम्यान 13 किलोमीटर अंतराचा उन्नत रस्ता तयार होईल आणि यासाठी 830 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित राहणार आहे.
वाघोली ते शिरूर यादरम्यान 56 किलोमीटरचा उन्नत रस्ता तयार होईल आणि यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित राहणार आहे.