Police Help Farmer In Dharashiv : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे मोठा फटका बसत आहे. या संकटांचा सामना करत बळीराजा बहुकष्टाने शेतमाल उत्पादित करतो त्याला देखील बाजारात चांगला भाव मिळत नाही. शासनाच्या कुचकामी धोरणामुळे आणि व्यापाऱ्यांच्या अनैतिक वागण्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल दरात विक्री होतो.
अशा आसमानी आणि सुलतानी संकटांच्या मध्यात सापडलेला बळीराजा यामुळे अक्षरशः बेजार झाला आहे. दरम्यान धाराशिव मधून एक अभिनव उपक्रम समोर येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने बळीराजाला मदतीचा हात दिला आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी आठवडी बाजार भरवला जात आहे.
या ठिकाणी सेंद्रिय शेतमाल विक्री होत असून त्यामुळे बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे. यामुळे सध्या या धाराशिव पॅटर्नची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा रंगत आहे. पोलीस म्हटलं की आपोआप मनात भीती निर्माण होते. चुकीच्या लोकांना सरळ करण्याचं काम हे मुख्यत्वे पोलिसांच्या माध्यमातून होते.
नियमांची पायामल्ली करणाऱ्या लोकांना आपल्या लाठीच्या सहाय्याने सरळ करणारे पोलीस आत्तापर्यंत आपण पाहिलेत. मात्र या खाकी वर्दीच्या आत असलेलं माणूसपण धाराशिव पॅटर्नमधून समोर आल आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी धाराशिव पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे समाजातील प्रत्येक स्तरावर कौतुक होत आहे.
हे पण वाचा :- पुणे, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Pune-Mumbai थेट विमानसेवा ‘या’ दिवशी सुरू होणार; असे राहणार तिकीट दर
नेमका काय आहे हा उपक्रम
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी हक्काची बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आता धाराशिव पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आठवडी बाजाराचे नियोजन केलं जात आहे. आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी येत आहे.
दर आठवड्याला हा बाजार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात भरवला जाणार असून पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणाहून सेंद्रिय भाजीपाला विकत घ्यावा असे आवाहन कुलकर्णी यांनी यावेळी केले आहे. निश्चितच पोलिसांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नुकतीच सेंद्रिय शेतीमालाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सेंद्रिय शेतीमालाची विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करण्यावर चर्चा झाली. यामध्ये ऑरगॅनिक मॉल तसेच धाराशिव जिल्ह्याचा स्वातंत्र्य ब्रँड तयार करण्यावर देखील चर्चा करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आठवड्याला सेंद्रिय शेतमालाची बाजारपेठ भरवली जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे विशेष दर ठरवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेंद्रिय शेतीमालाला सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एवढेच नाही तर शेतमाल विक्रीसाठी एक ॲप्लिकेशन देखील तयार केल जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत सेंद्रिय शेतमाल पोहचवला जाणार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शेतकऱ्यांना चांगली कमाई होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.