अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथून वारंवार पुरेसे धान्य मिळत नसल्याची तक्रार येत असल्याने आमदार निलेश लंके यांनी थेट निंबळक गावात रेशन दुकानदाराला गाठले.
तर रेशन दुकान उघडून मोफतचे धान्य, केशरी कार्डसाठी आलेले धान्य व पुरवठा करण्यात आलेल्या धान्यासह शिल्लक असलेल्या धान्य साठ्याची माहिती घेतली.
अत्यंत अभ्यासू व आक्रमकपणे आमदार लंके यांनी रेशन दुकानदारांना विविध प्रश्नांची सरबत्ती करताच दुकानदारांची भंबेरी उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक गोरगरीब कुटुंबीयांना व्यवस्थितपणे धान्य वितरण करुन योगदान द्या, यापुढे तक्रारी आल्यास व गोरगरीबांची फसवणुक झाल्याचे आढळल्यास सोडणार नसल्याचे थेट तंबीच त्यांनी रेशन दुकानदारास दिली.
निंबळक येथून रेशन दुकानदार धान्य देत नसल्याच्या अनेक तक्रारीचे फोन आमदार लंके दररोज सुरु होते. याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी थेट निंबळक गावात रेशन दुकानदाराला गाठले.
रेशन दुकानाची चौकशी करताना धान्य साठा शिल्लक राहत असल्याचे निदर्शनास आले. तर एका दुकानदाराने आपले रेकॉर्डच ठेवले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली.
त्यांनी पुरवठा अधिकारी यांना धान्य वितरणाबाबत होत असलेल्या चुकांबाबत माहिती दिली. आमदार लंके गावात आल्याचे कळताच अनेक महिला भगिनी कुपन घेऊन त्यांच्याकडे आल्या.
आमदार लंके यांनी दुकानदारास सुचना करुन केशरी रेशनकार्डसह इतर लाभार्थींना त्यांच्या हक्काचे अन्न-धान्य देण्याचे व संकट काळात उत्तमपणे काम करुन तक्रारी येऊ न देण्याचे आवाहन केले.