Maharashtra Online Ration Card : सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड दिले जाते. या रेशन कार्ड नुसार सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध होते. मात्र रेशन कार्ड मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते.
इतर अन्य शासकीय कामांप्रमाणेच रेशन कार्ड काढण्यासाठी देखील सामान्य नागरिकांना मोठा पैसा खर्च करावा लागतो. शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. विशेष म्हणजे अनेकदा वेळेवर सर्वसामान्यांना रेशन कार्ड उपलब्ध होत नाही.
अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक एजंटच्या माध्यमातून रेशन कार्ड काढतात आणि यासाठी सर्वसामान्यांना मोठा पैसा खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे एजंट लोकांनी रेशन कार्ड बनवण्यासाठी रेट देखील ठरवून दिले आहेत. खरं पाहता सर्वसामान्य लोकांना मात्र 20 रुपयात शासनाकडून रेशन कार्ड दिले जाते.
परंतु रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य लोकांकडून एजंट लोक दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम वसूल करतात. यामध्ये अनेक अधिकारी लोकांचा देखील समावेश होता हे मात्र वेगळं सांगायला नको. दरम्यान आता या अधिकाऱ्यांच्या आणि एजंट लोकांचा मुस्क्या आवळण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असेल.
राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता सर्वसामान्य लोकांना रेशन कार्ड मोफत आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यामुळे रेशन कार्ड काढण्यासाठी आता सर्वसामान्य लोकांना अधिकचा पैसा खर्च करावा लागणार नाही तसेच ऑनलाईन रेशन कार्ड मिळणार असल्याने आता सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
कसं मिळणार रेशन कार्ड
शासनाच्या या नवीन निर्णयानुसार आता लोकांनी नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ही माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याकडे जमा केली जाणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार नेमका कुठल्या वर्गातील आहे, यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जर अर्जदार हा अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असेल तर मग त्याला वीस दिवसात रेशन कार्ड मिळून जाणार आहे. यासाठी मात्र रेशन अधिकारी अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचा सर्व्हे करणार आहेत. तसेच पांढऱ्या रेशन कार्डसाठी आता सात दिवस लागणार आहेत. या ठिकाणी विशेष बाब अशी की कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रेशन कार्डसाठी अर्ज केलेला व्यक्ती जर रेशन कार्ड प्राप्त करण्यासाठी पात्र ठरला तर त्या व्यक्तीला रेशन कार्ड ऑनलाइनच डाउनलोड करता येणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच रेशन कार्ड कोणत्या दुकानदाराकडे देण्यात आले आहे याचा उल्लेख देखील केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकंदरीत शासनाच्या या नवीन निर्णयामुळे आता रेशन कार्ड मिळवणे खूपच सोपे झाले आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार आहे.