Poultry Subsidy:-कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला पूरक असलेल्या उद्योगधंद्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून शासनाच्या अनेक योजना आहेत. काही योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत करण्यात येते तर काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली जाते. जर आपण शेतीला असलेल्या जोडधंद्यांचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने पशुपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासारखे व्यवसाय शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर करतात.
यामध्ये पशुपालनाकरिता देखील योजना आहेत व कुक्कुटपालनासाठी देखील शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. त्यामध्ये जर आपण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचा विचार केला तर यामध्ये राष्ट्रीय पाळीव पशु कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये जर पोल्ट्री फार्म अर्थात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून 50% अनुदानावर 50 लाख कर्ज मिळते.
नेमकी कशा स्वरूपाचे आहे ही योजना?
भारताचे अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असून ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे या लोकसंख्येचा किंवा या भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म अर्थात कुक्कुटपालन व्यवसाय उभारणे गरजेचे असून याकरिता ग्रामीण भागामध्ये पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी सरकारकडून 50 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जात आहे. महत्वाचे म्हणजे यावर 50% अनुदान देखील मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला पन्नास लाख कर्जावर पंचवीस लाख रुपयांचे परतफेड करावी लागणार असून 25 लाख रुपये तुम्हाला सूट होणार आहे.
या योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकरी किंवा बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी कायद्याच्या कलम आठ अंतर्गत ज्या काही संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून कर्जाची सुविधा मिळते. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून या योजने करिता कर्ज देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. याकरिता सरकारने खास पोर्टल तयार केले असून त्याचे नाव आहे राष्ट्रीय पाळीव पशु मिशन पोर्टल म्हणजेच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन पोर्टल हे होय. तसेच ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे आहे त्याच्या नावावर कमीत कमी एक एकर शेत जमीन असणे गरजेचे असून आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडणे गरजेचे आहे.
समजा तुमची स्वतःची जमीन नसेल व तुम्ही लिजवर घेतलेल्या जमिनीवर देखील कर्ज घेऊ शकतात. परंतु या पद्धतीने दिले जाणारे कर्ज हे स्वतः तुम्ही आणि जमिनीचा मालक यांच्या नावाने दिले जाते. याकरता तुम्हाला तुमच्या पोल्ट्री फार्मचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे गरजेचे असते. नंतर हा ऑनलाइन फॉर्म पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
या योजनेत अर्ज करण्याकरता तुम्हाला तुमच्या उद्योगाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, तुमचे आधार कार्ड, ज्या जागेवर तुम्हाला पोल्ट्री फार्मचा उद्योग सुरू करायचा आहे त्या जागेचा फोटो, त्या जागेची आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, त्या बँकेतून तुम्हाला याकरिता कर्ज घ्यायचा आहे त्या बँकेत असलेला तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल चेक, रहिवासी दाखला, आवश्यक असणारे फॉर्म, जातीचा दाखला( लागू असेल तिथे ), कौशल्य प्रमाणपत्र आणि स्कॅन केलेले सही इत्यादी कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे तुमच्याकडे जमा झाल्यानंतर तुम्ही नॅशनल लाईव्ह स्टॉक पोर्टल वर जाऊन तुमचा स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड बनवून त्यावर अर्ज करू शकता.
अर्ज करताना ही काळजी घ्या
जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येतो. कागदपत्रे व्यवस्थित तुम्ही तपासून घ्यावी व तुम्हाला नेमके किती कर्जाची आवश्यकता आहे यानुसार अर्ज भरून तुम्ही त्यामध्ये नमूद करावे. तसेच प्रकल्प अहवाल खूप महत्त्वाचा असून यामध्ये तुमच्या व्यवसायाचे सगळे गणित व्यवस्थित नमूद करणे गरजेचे आहे.
कर्जासाठी तुम्ही राहत असलेल्या भागात कोणाशी संपर्क कराल?
ही योजना राबवण्याकरिता राज्य सरकार नोडल एजन्सी असून ऑनलाईन जरी अर्ज केला तरी तुमचे अर्ज याच एजन्सीच्या माध्यमातून बँकांपर्यंत पोहोचवले जातील. या योजनेच्या अधिक माहिती करिता तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.