Rural Business Idea :- व्यवसाय सुरू करताना तुम्ही राहत असलेला स्थानिक परिसर आणि त्या ठिकाणाच्या लोकांचे असलेली मागणी इत्यादी विचारात घेऊन तुम्ही जर व्यवसाय उभारायचे नियोजन केले तर नक्कीच तुम्हाला व्यवसायातुन चांगला पैसा मिळू शकतो. कुठलाही व्यवसाय सुरू करताना सगळ्यात अगोदर त्या व्यवसायाला असलेली मागणी विचारात घेणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला कृषी सेवा केंद्र स्थापन करायचे असेल आणि जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये गर्भ श्रीमंत लोक राहत असलेल्या सोसायट्यांच्या ठिकाणी जर ते उघडले तर ते चालू शकणार नाही.
परंतु ते जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये उघडले तर तुम्ही लाखो रुपये या व्यवसायातून कमवू शकतात. अगदी हीच पद्धत प्रत्येक व्यवसायाला लागू होते. भारताचे बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या मागणीमध्ये खूप पद्धतीचा वेगळेपणा दिसून येतो. त्यामुळे बऱ्याच प्रकारचे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये उत्तम रीतीने चालू शकतात.
यामध्ये खाद्यपदार्थ विक्रीशी संबंधित व्यवसाय किंवा भाजीपाला विक्रीशी संबंधित व्यवसाय जर तुम्ही सुरू केले तरी तुम्ही या माध्यमातून जास्त नाही परंतु दिवसाला एक हजार रुपयाच्या पुढे कमवू शकता. याच सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन या लेखामध्ये पाच असे व्यवसाय पाहणार आहोत की ते ग्रामीण भागामध्ये राहून देखील तुम्हाला चांगला पैसा मिळवून देऊ शकतात.
ग्रामीण भागात चांगला पैसा देऊ शकणारे पाच व्यवसाय
1- पशुपालन व्यवसायामध्ये गाय पालन व्यवसाय– ग्रामीण भागामध्ये शेती करत असताना अनेक जण पशुपालन व्यवसाय करतात. परंतु पशुपालन व्यवसाय मध्ये जर गाय पालन व्यवसाय केला तर नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. ग्रामीण भागामध्ये गाईला लागणारा हिरवा चारा किंवा इतर बाबी आरामात उपलब्ध होतात. ग्रामीण भागामध्ये गाईंचा व्यवसाय हा खूप फायद्याचा ठरू शकतो.
गाईच्या दुधाला चांगली मागणी असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय चांगला सुरू करता येतो. गावात असणाऱ्या दूध डेरीमध्ये तुम्ही दूध घालून दुधाच्या विक्रीतून पैसे मिळवू शकतात. याकरिता सुरुवातीला फक्त एक गायीची खरेदी करून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे जसा जसा व्यवसाय वाढत जाईल तशी तशी गाईंची संख्या वाढवावी. यामध्ये तुम्ही प्रत्येक घरी जाऊन गाईचे दूध विक्री करू शकतात किंवा डेअरीच्या माध्यमातून दूध विकून चांगला पैसा मिळवू शकतात.
2- शेळीपालन व्यवसाय– शेळी पालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेमध्ये करता येणारा व्यवसाय असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. शेळी पालन व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही जास्त शेळ्या न घेता तीन ते चार शेळ्यांची खरेदी करून हा व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे व टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या गोठ्यातील शेळ्या जेव्हा व्यायतात तेव्हा त्यांच्याच पिल्ल्यांपासून शेळ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच या व्यतिरिक्त तुम्ही बाजारातून आणखी शेळ्यांची खरेदी करून हा व्यवसाय वाढवू शकतात. आपल्याला माहिती आहे की बकरीच्या मांसाला खूप चांगली मागणी असल्यामुळे या व्यवसायातून तुम्ही कमीत कमी खर्चात उत्तम नफा मिळवू शकतात. या ठिकाणी योग्य काळजी घेतली तर शेळी पालन व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो.
3- फळ विक्रीचे दुकान सुरू करणे– फळ विक्रीचा व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुरू केला तर हा संपूर्ण बारा महिने उत्तम चालणारा व्यवसाय आहे. हंगाम पाहून तुम्ही तुमच्या फळांच्या दुकानातील फळांची विक्री केली तर ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. यामध्ये तुम्ही एका ठिकाणी दुकान घेऊन फळांची विक्री करू शकतात किंवा एखादी गाडी घेऊन देखील फळ विक्री करू शकतात.
एखादी गाडी घेऊन जर तुम्ही फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी किंवा तुमच्या गावाजवळून एखादा रस्ता जात असेल तर त्या ठिकाणी तुमची फळांची गाडी उभी करून देखील चांगल्या पद्धतीने विक्री करू शकता. याकरिता ताजेतवाने आणि चांगल्या दर्जांची फळे विक्री करणे खूप गरजेचे असून हा व्यवसाय देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच याच व्यवसायाला धरून तुम्ही फळांचा ज्यूस विक्रीचा व्यवसाय देखील करू शकता.
4- पाणीपुरीचे दुकान सुरू करणे– पाणीपुरी हा असा पदार्थ आहे की तो प्रत्येकाला आवडतो. हा व्यवसाय तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी गावातील बस स्टॅन्ड किंवा तुमच्या गावातील शाळा किंवा कॉलेज जवळ लावू शकतात. वर्षभर मागणी असणारा हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप कमी खर्च करावा लागतो. याकरिता तुम्हाला मोठ्या जागेची आवश्यकता ही भासत नाही.
तसेच लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठी तुम्ही पाणीपुरीच्या ऑर्डर देखील घेऊ शकतात. तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्ही जर व्यवस्थित केली तर तुम्हाला पाणीपुरीच्या ऑर्डर देखील मिळतात. याकरिता तुम्ही फक्त पाणीपुरी अर्थात गोलगप्पा मेकिंग मशीन खरेदी केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे मोठ्या ऑर्डर देखील पूर्ण करू शकतात. तुम्ही घरच्या घरी पाणीपुरी बनवू शकता किंवा एखाद्या व्यक्ती पाणीपुरी बनवत असेल तर त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून ती विकत घेऊ शकता. परंतु यामध्ये जर तुम्हाला स्वतःला पाणीपुरी बनवता येत असेल तर तुमचा नफा वाढेल.
5- भाजीपाला विक्री व्यवसाय– भाजीपाला विक्री व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये निश्चित चालणारा असा व्यवसाय आहे. कारण भाजीपाला ही दैनंदिन वापराची आवश्यक बाब असल्यामुळे भाजीपाला विक्री व्यवसायाला बाराही महिने चांगली मागणी असते. तुम्ही गावात असलेल्या बाजारपेठेच्या ठिकाणी किंवा एखाद्या चांगल्या गर्दीच्या ठिकाणी तुमचे दुकान लावू शकतात व व्यवसाय चालवू शकतात. तुम्ही एखाद्या हातगाडी घेऊन त्यावर भाजीपाला विक्री रस्त्यावर किंवा गावात फिरून देखील करू शकतात. तुमच्या जवळच्या भाजीपाला मार्केटमधून तुम्ही भाजीपाल्यांची खरेदी कमीत कमी दरात करून जास्तीचा नफा मिळवू शकतात.
अशा पद्धतीने हे पाच व्यवसाय तुम्हाला नक्कीच ग्रामीण भागात राहून देखील खूप चांगला प्रकारे पैसा मिळवून देऊ शकतात.