अद्याप परतू न शकलेल्या कामगारांची निवारा केंद्रावर व्यवस्था

Ahmednagarlive24
Published:

अमरावती : संचारबंदीमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर व प्रवाश्यांसाठी रेल्वे, बस आदी वाहने सोडण्यात येत आहेत. तथापि, अद्यापही परतू न शकलेल्या कामगार बांधव व प्रवाश्यांनी संयम ठेवावा. त्यांचीही व्यवस्था होत आहे.

अशा नागरिकांची निवास व भोजनाची व्यवस्था नसेल तर निवारा केंद्रावर ती सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना अर्थचक्राला गती देण्यासाठी काही उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. परराज्यातील नागरिक, कामगार बांधव यांना पोहोचविण्यासाठी रेल्वे व विविध वाहनांची सुविधा करण्यात येत आहे.

मात्र, अद्यापही काही नागरिक परतू शकले नाहीत. त्यांना पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, निवारा व भोजन व्यवस्था नसलेल्या अशा नागरिकांसाठी ती सुविधा निवारा केंद्रात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रत्येक तालुक्यात अशी निवारा केंद्रे स्थापण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधितांनी तहसील कार्यालयात संपर्क साधावा. कुणीही चालत जाऊ नये. थोडा संयम ठेवावा.

सगळ्यांची परतण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तोपर्यंत निवारा केंद्रावर निवास, भोजनाच्या व्यवस्थेबाबत निर्देश देण्यात आले आहेत, असे यावेळी श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यांपासून सर्वजण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले नागरिकही अमरावतीत परत येत आहेत.

हे नागरिक विविध झोन्समधून ये जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी. कोरोना प्रतिबंधासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांसाठी तपासण्यांचा वेग वाढविण्यात आला आहे.

सर्वेक्षणात सातत्य  ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सातत्यपूर्ण सर्वेक्षण, तपासण्या, उपचार, जनजागृती या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वदूर राबविण्यात येत आहेत.

कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे व तपासणी, सर्वेक्षण, चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

या काळात शासनाकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत असतानाच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या सुविधांची भर घालण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या या काळात नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा राज्यभर सुरू करण्यात आली आहे.

या माध्यमातून एखादा रूग्ण आपल्या आजाराबाबत माहिती देऊन डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकणार आहे. रविवार वगळता इतर सर्व दिवशी ही सेवा सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत सुरु राहील.

www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन रुग्णांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हा कोविड रूग्णालयातून उपचारानंतर २४ रूग्ण घरी परतले आहेत. हे दिलासादायक वृत्त असून, कोरोनाबाबत योग्य दक्षता व उपचार घेतले तर त्यावर मात करता येते हे दिसून येत आहे.

जिल्ह्यात आजवर ४५ रूग्ण घरी बरे होऊन परतले आहेत. योग्य उपचारांनी रुग्ण बरा होतो. त्यामुळे कुठलीही लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीने स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे. कुठलीही माहिती लपवू नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

कोरोना संसर्गाची साखळी तुटली नाही तर भविष्यात मोठ्या संख्येने रूग्ण वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वर्तवली आहे. त्यामुळे संयम, स्वनियंत्रणातूनच या साथीवर मात करता येईल.

दक्षतेसाठीचे उपाय नित्यासाठी अवलंबले पाहिजेत. ते आपल्या सुरक्षित जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजेत. सर्व नागरिकांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment