शेती म्हटले म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहतात. यामध्ये हवामानात सातत्याने होणारा बदल, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी, गारपीट, विविध प्रकारच्या फळबागांवर पडणाऱ्या विविध कीड व रोगांचा अति प्रादुर्भाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मजुरांची टंचाई या समस्या खूप प्रचंड स्वरूपात शेती क्षेत्राला आव्हान देणाऱ्या ठरत असून त्यांचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.
या अवघड असल्या सगळ्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकरी देखील आता खूप नवनवीन पद्धतीचे प्रयोग शेतीमध्ये करत असून जेणेकरून हवामान बदलामध्ये शेती व्यवसाय टिकून राहील हा त्यामागचा उद्देश आहे. शेतीमधील बरीचशी कामे हे मजुरांच्या साह्याने केली जातात.
परंतु बऱ्याचदा मजूर वेळेवर मिळत नाहीत किंवा वाढलेली मजुरीचे दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत अशा या दुहेरी समस्येमुळे शेतीची कामे वेळेवर पूर्ण होत नाही व या समस्येचा परिणाम देखील उत्पादन घटीवर होण्याची दाट शक्यता असते. या सगळ्या समस्यांच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी गणेश चौधरी यांनी चक्क तीन एकर क्षेत्रावर नारळाची लागवड केली आहे.
गणेश चौधरी यांनी तीन एकर क्षेत्रावर केली नारळाची लागवड
कुसुंबा येथील प्रयोगशील शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या खाचे यंत्राचे निर्माते गणेश चौधरी हे पंचक्रोशीतील एक नामांकित नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम ऍक्टिव्ह असणारे गणेश चौधरी हे शेतीमधील विविध प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रसिद्ध आहेत.
गणेश चौधरी यांनी त्यांच्या या प्रयोगशीलतेतून दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या नारळाच्या झाडांची लागवड केली असून पारंपारिक शेतीला छेद देत नारळ शेतीतून मजूर मुक्त शेतीचा प्रयोग आपण करत असल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले. पारंपारिक शेतीला फाटा देत त्यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये नारळाच्या झाडांची लागवड केली व या फळ पिकातून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील हाच पहिलाच प्रयोग आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.
या तीन एकर क्षेत्रामध्ये गणेश चौधरी यांनी कोलंबस आणि मलेशियन ग्रीन डार्क या वेगवेगळ्या प्रजाती असलेल्या नारळाच्या झाडांची लागवड केली असून यातील जर आपण कोलंबस या प्रजातीच्या नारळाच्या झाडाचे एकूण आयुर्मान पाहिले तर ते तब्बल पन्नास वर्षे असून मलेशियन ग्रीन डार्क या नारळाचे आयुर्मान साठ वर्ष आहे असे देखील गणेश चौधरी यांनी सांगितले.
नारळ शेतीतून मजूर मुक्त शेतीचा प्रयोग केल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले व या शेतीतून उत्पन्नामध्ये जी काही घट होते ती देखील कमी होणार आहे. जर आपण पारंपारिक पिकांचा किंवा फळ पिकांचा विचार केला तर कायमच बाजारामध्ये दरात चढ-उतार होत असते तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. परंतु नारळाच्या शेतीतून ही उत्पन्नात होणारी घट नक्कीच वाचण्यास मदत होईल असे देखील त्यांनी म्हटले. एवढेच नाहीतर भविष्यामध्ये नारळाचे पाणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्लॅनिंग असून याबाबतीत ते वेगळा प्रयोग करणार आहेत.