सांगलीच्या तरुण शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन फ्रुट! मिळाला 38 हजाराचा दर अन मिळाले लाखात उत्पन्न, वाचा माहिती

Ajay Patil
Published:

महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असून तंत्रज्ञानाची शेतीला जोड देऊन अनेक वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचा प्रयोगाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळवून आर्थिक प्रगती साधतांना दिसून येत आहेत.यामध्ये आता तरुण शेतकऱ्यांचा खूप मोठा सहभाग असून अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा व ते यामध्ये कायम पुढे असताना दिसून येत आहेत.

या नवनवीन पीक पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके तसेच फळपिके देखील महाराष्ट्रातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर घेत आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर उत्तर भारतामध्ये म्हणजे हिमाचल व जम्मू सारख्या थंड परिसरात येणारे सफरचंद देखील आता महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण ड्रॅगनफ्रुट या फळ पिकाचा विचार केला तर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रुट लागवड करत असून या माध्यमातून चांगले उत्पादन घेताना दिसून येत आहेत.

परंतु जर ड्रॅगनफ्रुटचा विचार केला तर ते प्रामुख्याने लाल रंगाचे आपल्याला माहिती आहे. गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मध्ये पहिल्यांदाच पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फळाची आवक झाली आहे. हे पिवळ्या रंगाचे ड्रॅगन फ्रुट सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने पिकवले असून त्याने पिकवलेल्या या पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुटला इस्रायल ड्रॅगन फ्रुट असे देखील म्हणतात.

 या शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन फ्रुट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या उटगी या गावचे शेतकरी उमेश लिगाडे यांनी पिवळ्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले असून 248 किलो पिवळे ड्रॅगन फ्रुट त्यांनी विक्री करिता रविवारी गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड या ठिकाणी आणले होते. या पिवळ्या ड्रॅगन फ्रुटला 38 हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. उमेश लिगाडे यांनी त्यांच्या शेतामध्ये सव्वा एकर क्षेत्रात या पिवळ्या ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. तसे पाहायला गेले तर ते साधारणपणे 2014 या वर्षापासून लाल ड्रॅगन फ्रुटची लागवड करत आहेत.

ड्रॅगन फ्रुट शेतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग राबवले असून 2021 मध्ये त्यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्याचा निश्चय केला व दोन हजार रोपाची लागवड केली होती. तब्बल दोन वर्षांनी आता पिवळ्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन त्यांना मिळायला लागले आहे. लाल रंगाच्या ड्रॅगन फ्रुटच्या तुलनेत पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटचा विचार केला तर हे टिकायला चांगले आहे. तसेच लाल ड्रॅगनफ्रुटच्या तुलनेमध्ये हे खायला देखील चविष्ट असल्याने त्याला मागणी चांगली आहे.

जर आपण ड्रॅगन फ्रुट या फळ पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने हे अमेरिकेतील वाळवंटामध्ये याची लागवड केली जायची. परंतु आता भारतामध्ये देखील अनेक राज्यात या ड्रॅगनफ्रुटची लागवड केली जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट लागवडीकरिता शेतकऱ्यांना मदत देखील केली जाते.

जर आपण सरकारी मदतीचा विचार केला तर ड्रॅगन फ्रुटच्या लागवडी करीता हेक्टरी एक लाख 60 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुट हे अनेक आजारांवर व त्वचेकरिता गुणकारी व फायदेशीर असल्यामुळे त्याला मागणी देखील चांगली असते त्यामुळे आता महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्याचे उत्पादन घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe