कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये शेतकऱ्यांचा आता हातखंडा झाला असून याकरिता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. कारण शेतकरी आता शेती क्षेत्रामध्ये जे जे काही तंत्रज्ञान आलेले आहे त्याचा कौशल्याने वापर करत असून त्यामुळे कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे.
शेतीमध्ये आधुनिकतेचे वारे व्हायला लागल्यापासून परंपरागत पिकांची जागा आता विविध प्रकारची भाजीपाला तसेच फळबागा पिकांनी घेतलेली आहे. व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती आणि यांत्रिकीकरणाचा वापर तसेच खत नियोजनाच्या बाबतीत आताच्या शेतकऱ्यांना असलेले संपूर्ण ज्ञान व त्याचा वापर शेतीमध्ये होत असल्यामुळे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोनातून आता शेती करत आहेत. याच सगळ्या मुद्द्यांचा प्रत्यय आपल्याला पोपट घुसाळकर यांच्या शेती पद्धतीवरून येतो. नेमके या शेतकऱ्याने काय केले? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

तैवान पिंक पेरूने दिली आर्थिक समृद्धी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, निमगाव केतकी येथील पोपट घुसाळकर या शेतकऱ्याने अत्यंत कमीत कमी पाण्यावर पेरूची बाग यशस्वी केली असून एका एकर मध्ये तब्बल 25 टन पेरूचे उत्पादन घेण्याचा विक्रम देखिल प्रस्थापित केला आहे. वास्तविक पाहता घुसाळकर यांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे भांड्यांचे विक्री करणे हे होय.
परंतु त्यासोबतच ते उत्तम पद्धतीने शेती देखील करत असून त्यांची एकूण अकरा एकर शेती आहे व त्यापैकी त्यांनी पाच एकर मध्ये पेरू, चार एकर मध्ये डाळिंब तर एका एकर मध्ये शेततळे उभारले असून त्या माध्यमातून फळबागाला पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. शेतीमध्ये काहीतरी नवीन करून यश मिळवायचे अशी इच्छा मनाशी ठरवून त्यांनी दीपक व संदीप या दोन्ही मुलांना सोबत घेऊन शेतिचे आधुनिक व्यवस्थापन करायला सुरुवात केली.
याकरिता त्यांनी साधारणपणे 2022 मध्ये नगर जिल्ह्यातील पाटेगाव येथून तैवान पिंक जातीची 3 हजार पेरूची रोपे आणली व एक रोप त्यांना 12 रुपये दराने मिळाले. त्यानंतर तीन एकर मध्ये त्यांनी तैवान पिंक पेरूच्या जातीची लागवड केली. या पेरू बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या परिसरातील आदर्श आणि प्रयोगशील शेतकरी मच्छिंद्र भोंग यांचे मार्गदर्शन घेतले व त्यांच्या मार्गदर्शनानुसार सगळे व्यवस्थापन केले.
या व्यवस्थापनासाठी एका एकरला अडीच लाख रुपये त्यांना खर्च आला व या हिशोबाने पाहिले तर तीन एकर तैवान पिंक पेरू करिता त्यांनी साडेसात लाख रुपये खर्च केला. परंतु तंत्रज्ञानाचा वापर आणि तंत्रशुद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी पहिल्याच तोड्यामध्ये किंवा पहिल्याच पिकात तब्बल 60 टन पेरूचे उत्पादन मिळवले.
विशेष म्हणजे त्यांनी पिकवलेला पेरू दर्जेदार असल्यामुळे जागेवर त्यांना 51 रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळाला व 60 टन पेरूचे उत्पादनातून त्यांना तब्बल तीस लाख रुपये मिळाले. म्हणजे अजून देखील पंधरा टन माल निघेल अशी शाश्वती त्यांना आहे व सध्या 75 रुपये प्रति किलोचा दर सुरू आहे. या माध्यमातून देखील 11 ते 12 लाख रुपयांचे उत्पादन आणखी मिळेल अशी देखील शाश्वती त्यांना आहे. म्हणजेच एकूण उत्पादन पकडले तर 40 ते 41 लाख रुपयांचे उत्पादन त्यांना तीन एकरात मिळेल.
अशा पद्धतीने जर आधुनिक व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती देखील खूप चांगल्या प्रकारे लाखोत पैसा देऊ शकते हे सिद्ध होते.