DA Hike:- केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक गेल्या कित्येक दिवसापासून महागाई भत्तावाढी संदर्भातली घोषणा होण्याची वाट पाहत होते. या सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल अशा बातम्या देखील माध्यमातून प्रसारित होत होत्या.
त्याच अनुषंगाने चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाही म्हणजे एक जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधी करिता केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. अगोदर कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत होता व आता या चार टक्के वाढीसह तो 46% पर्यंत गेला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा देशातील 47 लाख कर्मचारी व 68 लाख निवृत्तीवेतनधारक यांना होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये तर आता वाढ झाली परंतु पगाराच्या व पेन्शनच्या अनुषंगाने त्यामध्ये किती वाढ होईल हे देखील समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण महागाई भत्ता वाढ व त्या अनुषंगाने होणारी पगार वाढ याचे एक गणित समजून घेणार आहोत.
एखाद्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपये पगार असेल तर किती होईल पगारात वाढ?
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा जो काही पगार आहे तो सध्या 50 हजार रुपये आहे. आधी 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता व त्या अनुषंगाने दरमहा 21 हजार रुपये महागाई भत्ता मिळत आहे. परंतु आता त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता 46% झाला आहे व त्यामुळे दरमहा 23 हजार रुपये कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच याचा अर्थ आता ज्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार पगार आहे त्याला दरमहा 52 हजार रुपये पगार मिळेल. म्हणजेच यावरून पाहिले तर एका वर्षाचा फायदा हा 24 हजार रुपये होईल.
एक लाख रुपये पगार असेल तर किती मिळेल फायदा?
समजा एखाद्या कर्मचाऱ्याला एक लाख रुपये प्रतिमाह पगार आहे.तर सदरच्या 42% महागाई भत्त्याप्रमाणे त्याला 42 हजार रुपये मिळत होते. परंतु आता 46 टक्क्यानुसार महागाई भत्ता 46 हजार रुपये होईल म्हणजेच एक लाख रुपये पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रतिमाह चार हजार रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच आता एक लाख चार हजार रुपये पगार मिळणार आहे. एका वर्षाचा फायदा पाहिला तर यानुसार 48 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
महागाई भत्त्याची थकबाकी किती मिळेल?
हा महागाई भत्ता एक जुलैपासून लागू होणार आहे व त्यामुळे कर्मचाऱ्यांना गेला तीन महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला समजा पन्नास हजार रुपये पगार मिळाली तर त्याला 6000 रुपये थकबाकीचा लाभ मिळणार आहे व एक लाख रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला 12 हजार रुपये थकबाकी मिळणार आहे. 25 हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये थकबाकी मिळणार आहे.
पेन्शनधारकांना कसा होईल फायदा?
पेन्शन धारकांना महागाई सवलत दिली जाते व ती देखील 42 टक्क्यांवरून आता 46 टक्के करण्यात आली असल्यामुळे ज्या पेन्शन धारकाला वीस हजार रुपये पेन्शन मिळते व अशा कर्मचाऱ्यांना आठ हजार चारशे रुपये महागाई सवलत म्हणून दिले जातात. परंतु ती आता 46% झाल्यामुळे 9200 रुपयांची महागाई सवलत कर्मचाऱ्याला मिळेल.
म्हणजेच या नुसार पाहिले तर दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमध्ये आठशे रुपयांची वाढ होणार असून वीस हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्याला वीस हजार आठशे रुपये पेन्शन मिळणार आहे. जर एखाद्या पेन्शन धारकाला 50 हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्याला 21000 रुपये महागाई सवलत मिळते.
परंतु आता महागाई सवलतीत 46 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन असणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे व अशा कर्मचाऱ्याला 52 हजार रुपये पेन्शन मिळेल. या गणितानुसार या निर्णयाचा फायदा देशातील 68 लाख पेन्शन धारकांना होणार आहे.