Poultry Farm Business : बँकेकडून कर्ज घेऊन उभारला स्वयंचलित पोल्ट्री फार्म ! आता आहे लाखोत कमाई, वाचा कशाप्रकारे केले पोल्ट्रीचे नियोजन

Tejas B Shelar
Published:
Poultry Farm Business

Poultry Farm Business : शेती आता खऱ्या अर्थाने इंडस्ट्री वाटू लागली आहे ते फक्त तरुणांमुळेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण तरुणांनी शेतीचे जे काही परंपरागत स्वरूप होते ते पूर्णपणे पालटवून टाकले असून अनेक माध्यमातून लाखो आणि कोटी रुपयांची गुंतवणूक करून शेतीमध्ये विविध प्रकल्प उभारले जात आहेत.

यामध्ये फळ पिकांच्या लागवडीपासून तर शेडनेट या तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला आणि फुलपिके आणि व्यवसायिक दृष्टिकोनातून पशुपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासारखे व्यवसाय सुरू करून त्यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केलेला आहे.

अगदी घरापुरती शेती किंवा घराचा खर्च भागवेल या पुरता जोडधंदा अगोदर शेतकरी करायचे. परंतु आता त्याला व्यापक दृष्टिकोनातून केले जात असल्यामुळे शेती आणि शेतीचे जोडधंद्यांचे स्वरूप आता इंडस्ट्री प्रमाणेच म्हणजेच व्यावसायिकरित्या म्हणून पुढे आले आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण सातारा जिल्ह्यातील आकाश काळंगे या पदवीधर शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने बँकेकडून कर्ज घेऊन स्वयंचलित पद्धतीचा पोल्ट्री फार्म उभारला आणि मोठ्या मेहनतीने त्यातून लाखो रुपयांची कमाई सध्या करत आहे. यास तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

आकाश काळंगे यांनी उभारला स्वयंचलित पोल्ट्री फार्म

सातारा जिल्ह्यातील आकाश दत्तात्रय काळंगे हे पदवीधर शेतकरी असून त्यांच्या घरची 11 एकर बागायती शेती आहे. घरचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे शिक्षण घेताना शेती बद्दलची माहिती आणि अनुभव आकाशला होता. त्यामुळेच त्यांनी नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला.

शेतीला आर्थिक आधार मिळावा याकरिता कुक्कुटपालन करावे असा सल्ला त्यांचे नातेवाईक संतोष घाडगे यांनी त्यांना दिला. त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे शेतकरी करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करत होते

त्या पोल्ट्री व्यवसायाचा सखोल अभ्यास आकाशने केला व या क्षेत्रातील तज्ञांशी सल्ला मसलत करून आणि पोल्ट्रीला असलेली बाजारपेठ याचे सर्वेक्षण करून त्यातून लेयर कोंबडी पालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान आकाश यांनी सांगली व विटा या ठिकाणी जे काही स्वयंचलित पोल्ट्री युनिट होते त्यांची पाहणी केली. परंतु यामध्ये त्यांना निदर्शनास आले की अशा प्रकारच्या युनिटला खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. परंतु यातून मिळणारा आर्थिक फायदा देखील चांगला असल्यामुळे लेयर पोल्ट्री फार्म करण्याचे आकाशने निश्चित केले.

अशा पद्धतीने केली पोल्ट्री युनिटची सुरुवात

या सगळ्या प्रयत्नांमधून अत्याधुनिक युनिट उभारण्याकरिता बँकेकडून कर्ज घेतले व 2017 ते 18 या कालावधीत 230 बाय 33 फूट आकाराचे शेड उभारले. अशाप्रकारे शेडची उभारणी करताना सुमारे 13000 ते 14000 पक्षी बसतील अशी प्रत्येकी तीन म्हणजेच 42000 पक्षी मावतील अशा युनिटची उभारणी केली. यामध्ये शेड व लागणारी यंत्रे व पक्षी मिळून पावणेदोन कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली व आता ते सात कोटींच्या आसपास पोहोचली आहे. तसेच आकाशाला यामध्ये एक समस्या दिसून आली ती म्हणजे जर चांगल्या कंपनीचे खाद्य जर कोंबड्यांना दिले तर खाद्यावरील खर्च वाढतो

व पर्यायाने पोल्ट्री व्यवस्थापना वरील खर्चात देखील वाढ होते. त्यामुळे हा खर्च कमी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःचे फीड मिल म्हणजे खाद्य तयार करण्याची मिल उभारण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता पोल्ट्री शेडच्या बाजूला 40 बाय 30 फूट आकाराची शेड उभारले व त्यामध्ये बारा लाख रुपये खर्च करून स्वतःचीच फीडमिल उभारली. यामध्ये कच्चामालाची स्वतः खरेदी केली व दर्जेदार असे खाद्य तयार करायला सुरुवात केली. या माध्यमातून दररोज चार टन खाद्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे आकाशला दुहेरी फायदा झाला. यातील पहिला म्हणजे खर्च तर कमी झालाच व कोंबड्यांना दर्जेदार असे खाद्य देखील मिळाले.

दररोज 15 ते 25 हजार अंड्यांचे उत्पादन

या लेयर पोल्ट्री फार्म म्हणजेच अंडी उत्पादन युनिट मधून आकाश यांना दररोज 15 ते 25 हजार अंड्यांचे उत्पादन मिळते. त्यांनी आकाश एग्ज या नावाने ब्रँड तयार केला असून या नावाने ही अंडी पुणे तसेच सातारा व मुंबई या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना जागेवरच विकले जातात. यामध्ये प्रती नग साडेतीन ते साडेचार रुपयांचा आसपास त्यांना खर्च येतो. परंतु संपूर्ण वर्षाची सरासरी काढली तर प्रति अंडे साडेचार ते पाच रुपये असा दर मिळतो. म्हणजेच 15 ते 20 टक्के नफा या माध्यमातून मिळतो. घरची छोटी गाडी घेऊन अंडी वेळेवर हवे त्या ठिकाणी पोहोचता येतात.

अशाप्रकारे केले जाते व्यवस्थापन
यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांकडून ते 12 आठवडे वयाचे पक्षी हातात व युनिटमध्ये वाढवतात. साधारणपणे 20 आठवड्यानंतर ते अंडी द्यायला सुरुवात होतात व 80 आठवडे पर्यंत पक्षी अंडी देतात. या कालावधीनंतर पक्षांची विक्री केली जाते व पुढील बॅच करिता पैशांची उभारणी या माध्यमातून होते. पहाटे चार पासून या युनिटमध्ये काम सुरू केले जाते. सगळ्यात अगोदर संपूर्ण युनिट ची सकाळी स्वच्छता होऊन शीट बेल्टच्या माध्यमातून पक्षांची विष्ठा बाहेर काढली जाते.

तसेच दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये बेल्ट एलेवेटरच्या उपयोग करून अंडे बाहेर काढले जातात व त्यानंतर त्यांना पॅक करून विक्रीसाठी पाठवले जातात. त्यामध्ये कोंबड्यांना स्वयंचलित पद्धतीनेच पाणी पिण्यासाठी निप्पल यंत्रणा असून त्यातून गरजेनुसारच पाणी उपलब्ध होते. प्रत्येक 40 दिवसांनी कोंबड्यांना लासोटा लस व इतर आवश्यक औषधे दिली जातात. त्यामुळे पक्षी निरोगी राहतात. तसेच फीड मिल मध्ये तयार केलेले खाद्य चांगले राहावे याकरिता 18 टन क्षमतेची सायलोची सुविधा देखील उभारलेली आहे. हिवाळ्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण युनिट बंदिस्त ठेवण्यात येते व उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढू नये याकरता शेडच्या पत्रांवर उसाची पाचट वापरून

त्याच्या आच्छादन केले जाते व ठिबक सिंचनाचा व पंख्यांचा देखील वापर केला जातो.
अशा पद्धतीने आकाश या तरुण शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने बँकेकडून कर्ज घेऊन स्वयंचलित म्हणजेच ऑटोमेशन पद्धतीचा पोल्ट्री फार्म उभारला आणि त्या माध्यमातून तो आता लाखोंची कमाई करत आहे. यावरून आपल्याला दिसून येतो की मनामध्ये जिद्द असेल आणि काहीतरी करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती कमी पैशात देखील मोठा व्यवसाय उभारू शकतो हे सिद्ध होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe