शिर्डी :- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ.भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला,अगदी स्वताच्या तालुक्यातील जनतेनेही त्याना लीड न देता नाकारले.
शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघात लोखंडे यांनी सुमारे एक लाख २० हजारांहून अधिक मताधिक्क्याने आमदार कांबळे यांना हरवले.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तब्बल २१ हजार ४५८ मतांनी तेथून आघाडी घेत कांबळे यांच्या होमपिच वरच घाला घातला.स्वतःच्याच मतदारसंघात झालेली ही हार त्यांना जिव्हारी लागली.
श्रीरामपुरात त्यांना तब्बल २० हजार मते कमी पडल्याने त्यांची राजकीय कारकिर्दच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
जयंतराव ससाणे यांचे विश्वासू
ससाणेचे विश्वासू म्हणून आमदार नगरसेवक म्हणून कांबळे यांनी कारकिर्द सुरु केली होती. स्व. जयंतराव ससाणे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून कांबळे ओळखले जायचे. त्यामुळेच ससाणेंनी त्यांना उपनगराध्यक्ष केले होते.
विखेंच्यामुळे दुस-यांदा विधानसभेत …
पहिल्या पाच वर्षापैकी ४ वर्ष ससाणे – कांबळे यांच्यात दुरावा नव्हता. शेवटच्या वर्षी काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.
त्यामुळे दुस-या विधानसभेला कांबळेना शिवसेनेकडून उभे करण्यापर्यंत राजकारण ससाणे गटाकडून खेळले गेले,
परंतु राजकीय कुरघोडी करत विखे गटाने मातोश्रीकडे निघालेल्या कांबळेना थेट काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडे नेवून दुस-यांदा काँग्रेसची उमेदवारी देवू केली,
दुस-यांदा विधानसभेची निवडणूक लढवताना ससाणे गट नाराज असताना विखे यांच्या ताकदी मुळे कांबळे दुस-यांदा आमदार झाले.
त्यामुळे आपोआप ससाणे गटापासून कांबळे दूर गेले आणि विखे गटाच्या ते जवळ आले ….
पवार आणि थोरातांच्या राजकारणात कांबळेचा बळी !
लोकसभा निवडणूक तिकीट वाटपात जिल्ह्यात मोठे राजकारण बदलले. शरद पवारांनी नगरची जागा सुजय विखेंना सोडायला नकार दिला. त्यामुळे सुजय विखे भाजपात गेले.
आणि राधाकृष्ण विखे यांनाही त्यामुळे सुजय यांना मदत करणे अत्यावश्यक झाले. या संधीचा फायदा घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कांबळेची उमेद्वारी निश्चित केली.
कांबळे आणि ससाणे हे दोघेही विखे समर्थक असल्याने आणि विखे हे भाजपात गेल्याने विखेंना पक्षीय पातळीवर आणि स्थानिक पातळीवर अडचणीत आणण्यासाठी ही खेळी थोरात यांनी खेळली
माजी मंत्री थोरात यांनी कांबळे यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसविले.
थोरातांचे नेतृत्व स्वीकारले आणि …
सर्व प्रकारची ताकदशक्ती पुरविण्याचे आश्वासन दिल्याने आ. कांबळे यांना या सर्व ताकदीपुढे विखे यांची ताकद कमी दिसली असावी. त्यामुळे त्यांनी विखेंची साथ सोडून थोरातांचे नेतृत्व स्वीकारले आणि इथेच आ. कांबळे चुकले.
साथ देण्याऐवजी मी फार पुढे गेलो ….
अडचणीच्या काळात आ. कांबळे यांनी विखे यांचा शब्द डावलला. ‘विखे घेतील तो निर्णय मान्य’ असे म्हणत कांबळे यांनी विखेंना साथ देणे अपेक्षित होते. मात्र साथ देण्याऐवजी मी फार पुढे गेलो आहे ,अशा प्रकारचे अनपेक्षित उत्तर कांबळेकडून आले.
..ज्यांनी राजकारणात मोठ केल त्यांच्याविरोधात …
ज्या स्व. ससाणेंनी पहिल्यांदा आमदार करण्यासाठी कांबळेच्या मागे साम, दाम, दंड, भेद अशी सर्व ताकद लावून आमदार केले. ज्या विखेंनी दुस-यांदा आमदार करताना कांबळेना सर्व ताकदीनिशी मदत केली.त्यांच्याच विरोधात आ.कांबळे गेले.
कांबळेकडून राजधर्म न पाळण्याची चूक …
राजकारणात ज्यांनी मदत केली. ज्यांनी आपल्याला मोठ्या पदावर नेले ती व्यक्ती अडचणीत असताना तिला प्रसंगी नुकसान सोसून साथ देण्याची गरज असताना केवळ राजकारणात आपण मोठे होवू म्हणून इतरांच्या नादी लागल्याने आणि खरा राजधर्म न पाळण्याची चूक कांबळेकडून झाली.
स्वताच्याच मतदारसंघात मतदारांनी नाकारले !
त्यामुळेच आता त्यांनी राजकीय कारकिर्द धोक्यात आली, ज्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात कांबळे दोनदा आमदार झाले. त्याच मतदार संघात लोकसभा निवडणुकीत कांबळे २० हजार मतांनी मागे पडले आहेत.
राजकीय कारकिर्द एका चुकीमुळे धोक्यात
मुरकुटे – आदिक यांची ताकद त्यांच्या मागे असताना कांबळे मोठ्या फरकाने मागे पडल्याने आणि येत्या पाच – सहा महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने कांबळेंची राजकीय कारकिर्द एका चुकीमुळे धोक्यात आल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
आ.कांबळे यांना आता जनता स्विकारेल ?
येत्या पाच – सहा महिन्यात होणार्या विधानसभा निवडणुकीत कांबळे पुन्हा निवडणुकीची तयारी करतील. त्यांना पुन्हा जनता स्विकारेल का, असा प्रश्न आहे. कारण आता श्रीरामपूर तालुक्यावरही विखे कुटुंबियांचे वर्चस्व हळूहळू वाढणार आहे.