अहमदनगर जिल्हा हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध. महसूलमंत्री म्हणून विखे पाटलांनी जे कार्य केले ते चांगले कार्य केले व त्याची चर्चा देखील राज्यभर होते. परंतु आता महसूलमंत्र्यांच्याच होमग्राउंड जिल्ह्यात वाळूतस्करी फोपवताना दिसत आहे.
शेवगाव येथे तहसीलदारांच्या अंगावर ढंपर घालण्याचा किस्सा ताजा असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे आणि त्यांचे भाऊ उदय मुंडे यांच्यावर वाळू चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. यंत्र मात्र गुन्हा राजकीय द्वेषातून झाल्याचे मुंडे समर्थक म्हणत आहेत. यावरून आता नगरचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
पिंगेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील 25 ब्रास वाळू चोरीला गेलेली होती. मंडल अधिकारी अय्या अण्णा फुलमाळी यांनी उदय मुंडे व भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. याचदरम्यान पिंगेवाडीच्या सरपंच रंजना अशोक तानवडे यांनी ग्रामपंचायातीच्या वाळू चोरीची तक्रार पोलीस व महसूल प्रशासनाकडे केली.
परंतु तक्रार दाखल करण्यात येत नसल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात
धाव घेतल्यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. आता भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मुंडे समर्थक आक्रमक
दरम्यान या घटनेनंतर मुंडे समर्थक मात्र आक्रमक झाले आहेत. राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल होत आहेत असे ते म्हणत आहेत. खोटे वाळूचे गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी करत त्यांनी या आशयाचे निवेदनही पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना त्यांनी दिले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी आक्रमक होत पोलिस निरीक्षकांविरोधात घोषणाबाजी देखील यावेळी केली.
निनावी अर्जावर राजकीय अकसातून अरुण मुंडे यांचे नाव गुंतवले
भाजप ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. शेवगाव तालुक्यात अवैध दारू, मटका-जुगार असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत परंतु त्याकडे कुणाचे लक्ष नाही, परंतु दुसरकिडे एका निनावी अर्जावर राजकीय द्वेषातून अरुण मुंडे यांचे नाव गुंतवले जात आहे. यातून त्यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा डाव असल्याचे कार्यकर्ते म्हणाले.