Profitable Business Idea:- कांदा हे असे पीक आहे की शेतकऱ्यांना फायदा देण्यापेक्षा बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटाच देते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार केला तर तीन ते चार वर्षानंतर थोडाफार बाजार भाव चांगला मिळतो व एवढा अपवाद वगळता बाकीचे दिवस कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी साधारण परिस्थिती आहे.
यामागे सरकारी धोरणापासून ते अनेक परिस्थिती कारणीभूत आहे. या सगळ्या आर्थिक दृष्टचक्रामधून जर बाहेर पडायचे असेल तर कांद्यावर प्रक्रिया करून तयार प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री करणे हे कांदा उत्पादन करून बाजारपेठेत विकण्यापेक्षा नक्कीच आर्थिक दृष्ट्या फायद्याचे ठरू शकते.
दुसरी महत्त्वाचे बाब म्हणजे कांदा हा स्वयंपाक घरामध्ये लागणारा महत्त्वाचा पदार्थ असून कांद्याचे भाव जर वाढले तर गृहिणींचे आर्थिक बजेट विस्कटते. या परिस्थितीत देखील कांद्यावरील प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कांद्यापासून तसे पाहायला गेले तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येतात. परंतु जर कांद्यापासून कांद्याची पेस्ट तयार केली व त्याची विक्री केली तर नक्कीच हा व्यवसाय शेतकरी बंधूंना चांगला पैसा देऊ शकतो.
कांदा पेस्ट बनवण्याच्या व्यवसायासाठी किती येतो खर्च?
साधारणपणे जर आपण कांद्यापासून पेस्ट बनवण्याचा व्यवसायाचा एकंदरीत खर्च पाहिला तर याबाबत केव्हीआयसी अर्थात खादी ग्रामोद्योग आयोग यांचा कांदा पेस्ट बनवण्याचा संबंधीचा प्रोजेक्ट रिपोर्टनुसार हा चार लाख 19 हजार रुपयांपर्यंत येतो. तसेच सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून देखील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकते.
उदाहरणच घ्यायचे झाले तर सरकारच्या मुद्रा योजनेतून तुम्हाला कर्ज सुविधा याकरिता मिळते. खादी ग्रामोद्योग आयोगाचा अहवाल पाहिला तर कांदा पेस्ट बनवण्याचा युनिट उभा करण्यासाठी तुम्हाला चार लाख एकोणावीस हजार रुपये इतका खर्च येतो व यामध्ये आवश्यक इमारतीचे शेड बांधण्याकरिता एक लाख रुपये आणि तळण्याचे पॅन, ऑटोक्लिव स्टीम कुकर, डिझेल भट्टी तसेच निर्जंतुकीकरण टाकी, छोटी भांडी, मग आणि कफ इत्यादी उपकरणे लागतात व याकरिता तुम्हाला एक लाख 75 हजार पर्यंत खर्च येतो. तसेच व्यवसाय चालवण्याकरिता खेळते भांडवल व इतर आवश्यक गोष्टींकरिता तुम्हाला दोन लाख 75 हजार रुपयांची गरज भासते.
या व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल?
कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायामध्ये पेस्ट जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा तिला जर चांगल्या प्रकारे पॅकिंग केली व नंतर बाजारपेठेत विक्री करायला सुरुवात केली तर विक्री चांगली होते. विक्री वाढवण्याकरिता तुम्ही सोशल मीडिया सारख्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा देखील वापर करू शकतात. तसेच कंपनीची वेबसाईट बनवून तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरात व माहिती टाकू शकतात व बरेच मार्केटिंगचे फंडे तुम्ही यामध्ये आजमावून तुमचा व्यवसाय वाढवू शकतात.
कांदा पेस्ट विक्रीतून किती मिळते कमाई?
जर आपण खादी ग्रामोद्योग आयोगाचा अहवाल पाहिला तर जर तुम्ही पूर्ण क्षमतेने कांदा पेस्ट तयार करणे सुरू केले तर तुम्ही एका वर्षामध्ये साडेसात लाख रुपयांची पेस्ट विकू शकतात. यामधून जर तुम्ही तुमचा खर्च वजा केल्यास एकूण सरप्लस एक लाख 75 हजार होतो व अंदाजे पाहिला तर निव्वळ नफा तुम्हाला या माध्यमातून एक लाख 48 हजार रुपये मिळू शकतो.
अशाप्रकारे तुम्ही कांदा पेस्ट व्यवसायातून हळूहळू खूप चांगल्या प्रकारे जम बसवून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात.