Home Loan Tips:- स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु सध्या महागाईच्या कालावधीमध्ये जर पाहिले तर घर घेणे किंवा घर बांधणे हे वाटते तितके सोपे नाही. म्हणून आपल्या स्वप्नातील घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच मध्यमवर्गीय व्यक्ती होम लोनचा आधार घेतात. होम लोन घेतल्यानंतर घर किंवा फ्लॅट खरेदी केला जातो.
परंतु जर आपण अशा घेतलेल्या होम लोनचा विचार केला तर या लोनच्या परतफेडीसाठी आपल्या पगारातील फार मोठा भाग प्रत्येक महिन्याला ईएमआय स्वरूपात खर्च होत असतो. तसेच दुसरी बाब म्हणजे होमलोन हे दीर्घ कालावधी करिता असतात. पुढे आपल्याला फार मोठ्या कालावधी करिता या कर्जाचे हप्ते भरणे गरजेचे असते.
अशावेळी बऱ्याचदा काही परिस्थितीमुळे आपल्या घराचे आर्थिक बजेट यामुळे कोलमडू शकते व मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती उद्भवू नये याकरिता घर खरेदी करताना जर नोकरदार व्यक्तींनी 3/20/30/40 चा फॉर्म्युला वापरला तर तुमच्यावर फार मोठा आर्थिक ताण पडणार नाही व आर्थिक बजेट देखील बिघडणार नाही.नेमका हा फार्मूला काय आहे?आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ.
काय आहे नेमका हा फार्मूला?
1- 3 म्हणजे नेमके काय?- या फार्मूलातील पहिला अंक येतो तीन व याचा अर्थ म्हणजे तुम्ही जे घर खरेदी करणार आहात त्या घराची किंमत तुमचे जे काही वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे त्याच्या तिप्पट नसावी. म्हणजे समजा तुमचे वर्षाला उत्पन्न जर दहा लाख रुपये असेल तर तुम्ही तीस लाख रुपये पर्यंतचेच घर किंवा फ्लॅट खरेदी करावा. त्यापेक्षा जास्त कर्ज तुम्ही घेऊ नये.
2-20 म्हणजे नेमके काय?- या सूत्रातील 20 या अंकाचा विचार केला तर तुमचा कर्जाचा कालावधी यामध्ये नमूद केलेला आहे. जे आपण कर्ज घेतो ते कर्ज परतफेडीचा कालावधी जितका कमी तितका तो चांगला असतो. यामध्ये तुमचा ईएमआय तुमच्यावर आर्थिक दृष्ट्या ओझे बनवू नये आणि तुम्हाला तो अगदी सहजपणे भरता येईल यासाठी तुम्ही वीस वर्षापर्यंत कर्जाचा कालावधी निश्चित करणे गरजेचे आहे. त्यापेक्षा जास्त कालावधी ठेवू नये.
3-30 म्हणजे नेमके काय?- या सूत्रातील 30 या अंकाचा अर्थ जर पाहिला तर तो तुमच्या कर्जाच्या मासिक ईएमआयशी संबंधित आहे. म्हणजेच तुमचा ईएमआय तुमच्या पगाराच्या किंवा उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त नसावा. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही जर 70 हजार रुपये महिन्याला कमवत असाल तर तुमचा मासिक ईएमआय 21000 रुपयांपेक्षा जास्त नसावा.
4-40 म्हणजे नेमका काय?- या फॉर्मुल्यातील 40 म्हणजेच तुमचे घर खरेदी करण्यासाठी भरायचे डाऊन पेमेंट होय. म्हणजे जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा तुम्हाला डाऊन पेमेंट करणे गरजेचे असते. डाऊन पेमेंट करताना तुम्ही 40% डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्ही तर 40% डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला कमीत कमी कर्ज घ्यावे लागते आणि जर तुम्ही कमी कर्ज घेतले तर तुम्ही छोट्या हप्त्यांमध्ये आणि कमी वेळेत ते परत करू शकतात.
हेच जर उदाहरणांनी समजून घेतले तर समजा तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे आणि तुम्ही तीस लाख रुपयांचा फ्लॅट विकत घेतला तर तुम्ही बारा लाख रुपये डाऊन पेमेंट करणे गरजेचे आहे. उरलेले 18 लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला घ्यावे लागते व त्याचे ईएमआय तुम्हाला भरणे गरजेचे असते.
त्यामुळे घेतलेल्या गृह कर्जाचा मोठ्या प्रमाणावर बोजा तुमच्यावर पडू नये म्हणून या सूत्रानुसार जर तुम्ही तुमच्या घेतलेल्या कर्जाच्या नियोजन केले तर तुम्ही आरामात कुठलाही आर्थिक ताण न येऊ देता ते कर्ज परतफेड करू शकतात.