Poultry Farming Tips:- शेतीला जोडधंदा म्हणून आता पशुपालनासोबतच पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून आता केला जातो. परंतु जर पोल्ट्री फार्मचा विचार केला तर यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतूनुसार कोंबड्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते.
कारण बदलत्या हवामानाला किंवा वातावरणामध्ये कोंबड्यांना अनेक प्रकारचे आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. या अनुषंगाने जर आपण हिवाळ्याचा विचार केला तर हा कालावधी पोल्ट्री उत्पादकांकरिता आणि पोल्ट्री फार्मसाठी खूप धोक्याचा समजला जातो. तुमचे थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी देखील तुमचे लाखोंचे नुकसान या कालावधीत होण्याची शक्यता असते.
त्यामुळे थंडीपासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे याकरिता विविध महत्त्वाच्या उपाययोजना करणे देखील खूप गरजेचे असते. कारण कोंबड्यांना जर थोड्या प्रमाणात जरी थंडीचा प्रभाव जाणवला तरी कोंबड्यांचा मृत्यू होण्याची शक्यता उद्भवते. यामध्ये पोल्ट्री फार्मिंग तज्ञांच्या मताचा विचार केला तर त्यानुसार फेब्रुवारी हा कालावधी कोंबड्यांसाठी खूपच धोकादायक असतो.
यामध्ये निव्वळ कोंबड्याचं नाही तर लहान पक्षी तसेच बदक, टर्की पक्षी इत्यादीसाठी देखील हा कालावधी धोक्याचा समजला जातो. कारण या कालावधीमध्ये इतर बाहेरील देशातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांचे स्थलांतरण होत असते व हे पोल्ट्री पक्षांचे म्हणजेच कोंबड्यांचे सर्वात मोठे शत्रू असतात.
याबाबतीत जर आपण सेंट्रल एव्हिएन रिसर्च इन्स्टिट्यूट, बरेलीच्या संचालकांचे मत पाहिले तर त्यांच्यानुसार अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचा अवलंब पोल्ट्री फार्ममध्ये केल्यास कोंबड्यांचा बर्ड फ्लू पासून संरक्षण आपल्याला करता येते. कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये स्थलांतरित पक्षी परतायला सुरुवात होतात.
पोल्ट्री फार्मिंगमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचा धोका काय आहे?
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या कालावधीत इतर देशातून स्थलांतरित पक्षी आपल्या देशामध्ये आले असून ते अजून देखील या ठिकाणीच आहेत. आपण बारकाईने लक्ष दिले तर हे स्थलांतरित पक्षी तलाव, नद्या आणि तलावांचा जो काही आसपासचा भाग असतो त्या ठिकाणी आपले निवासस्थान बनवतात व त्या ठिकाणी राहतात.
अशा पाण्याच्या स्त्रोतांजवळ भारतीय बदक देखील असतात व हे बदक अशा स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात लवकर येतात. अशा परिस्थितीत या स्थलांतरित पक्षांमध्ये जे काही आजार असतात ते भारतीय बदकांमध्ये पसरणार नाहीत किंवा बदकांच्या माध्यमातून हा रोग इतर ठिकाणी पसरणार नाही याबाबती कुठलीही हमी आपल्याला देता येत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत बर्ड फ्लू सारख्या धोकादायक आजाराकडे आपल्याला दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. कारण या स्थलांतरित पक्ष्यांची चाचणी किंवा टेस्ट करण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे या पक्षांना बर्ड फ्लू होणार नाही अशी शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे घ्यावी या पाच गोष्टींची काळजी
त्यामुळे तज्ञांच्या मते जर तुमचा पोल्ट्री फार्म बर्ड फ्लू आणि इतर आजारांपासून जर सुरक्षित ठेवायचा असेल तर तलाव किंवा आधीपासून तुमचा पोल्ट्री लांब असणे गरजेचे आहे. पोल्ट्री फार्मच्या शेजारी तलाव किंवा नदी असली तर त्या ठिकाणची बदके पोल्ट्री फार्मच्या जवळ किंवा शेतामध्ये देखील येऊ देऊ नये.
शेताच्या आजूबाजूला किंवा पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला झाडे लावू नका. जर झाडे असतील तर ती काढून टाकणे फायद्याचे ठरेल. तसेच पोल्ट्री फार्मिंग च्या छतावर देखील बाहेरील पक्षांना बसू देऊ नका. कारण बर्ड फ्लू सारखे आजार हे पक्षांच्या विष्टेतून जास्त करून पसरतात.
तसेच या कालावधीत बाहेरच्या व्यक्तींना शेतात येऊ देऊ नका. जर आवश्यक असेल तर त्या व्यक्तीचे कपडे, शूज आणि हात स्वच्छ करायला लावा. पोल्ट्री फार्म मध्ये त्याला जायचे असेल तर त्याला घालण्याकरिता एक किट द्या. तसेच फीड किंवा इतर कामांसाठी जर वाहन येत असेल तर त्याचे निर्जंतुकीकरण करून घ्या. तसेच पोल्ट्री फार्म असलेल्या शेतकऱ्यांनी एकमेकांची उपकरणे किंवा वस्तू वापरणे टाळावे.
या पद्धतीने जर तुम्ही या छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही तुमचा पोल्ट्री फार्म बर्ड फ्लूच नाहीतर इतर आजारांपासून देखील दूर ठेवू शकतात.