पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्याकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. या एकूण रासायनिक खतांच्या वापरामध्ये युरियाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. कारण पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया हा आवश्यक असतो.
त्यामुळे युरिया हे पिकांसाठी एक महत्त्वाचे आणि आवश्यक असे खत आहे.सध्या बाजारामध्ये नॅनो युरिया हा द्रव्य स्वरूपात मिळतो व निमकोटेड युरिया मिळतो. परंतु आता केंद्र सरकारने युरिया गोल्ड म्हणून नवीन युरिया लॉन्च केला व या निर्णयाला नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.
एवढेच नाही तर हा सल्फर कोटेड युरिया असून त्याची निर्मिती करण्याला व बाजारात विक्रीसाठी आणायला देखील आता सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. या युरिया विषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
सल्फर कोटेड नवीन युरियाची गोणी 40 किलोची मात्र किंमत तीच
हा नवीन युरिया आता सल्फर कोटेड युरिया म्हणून बाजारात येणार आहे व या नवीन युरियाची गोणी 40 किलो वजनाची आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना एकप्रकारे तोटा होईल अशी स्थिती आहे.
कारण युरियाच्या एका गोणीकरिता शेतकऱ्यांना अगोदर 266.50 प्रति बॅग एवढा खर्च येत होता व ही निमकोटेड युरियाची गोणी मात्र 45 किलो वजनाची होती. परंतु हा सल्फर कोटेड युरियाची गोणी 40 किलोचीच आहे. परंतु याची किंमत मात्र अगोदरच्या युरियाच्या गोणी इतकेच म्हणजेच 266.50 रुपये प्रति गोणी इतकी आहे.
केंद्र सरकारकडून यासंबंधीचे अधीसूचना जारी
महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या माध्यमातून या संबंधीचा निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून ती सर्व खत उत्पादक कंपन्यांना देखील पाठवण्यात आलेली आहे. जर आपण 28 जून 2023 रोजी झालेल्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीचा विचार केला
तर या समितीने या सल्फर कोटेड युरिया गोल्ड नावाने लॉन्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या युरियाची निर्मिती करण्याला व तो बाजारात विक्रीसाठी आणण्याकरिता खत उत्पादक कंपन्यांना मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हा सल्फर कोटेड युरिया शेतकऱ्यांना वापरास उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या अगोदरचा युरिया आणि आत्ताचा सल्फर कोटेड युरियामधील फरक
ही नवीन लॉन्च करण्यात आलेली सल्फर कोटेड युरियाची गोणी 40 किलोची आहे व सध्या मिळत असलेल्या निमकोटेड युरियाची गोणी 45 किलो वजनाची आहे. आपण जे सध्या निमकोटेड युरियाची गोणी घेतो तिची किंमत जीएसटीसह 266.50 रुपये इतकी आहे. परंतु विशेष म्हणजे या दोनही युरियाच्या गोणींचे दर मात्र सारखेच आहेत. परंतु वजनात मात्र पाच किलोचा फरक असणार आहे.
सल्फर कोटेड युरियाचे फायदे काय?
युरिया म्हटले म्हणजे यामध्ये नायट्रोजन असते. या सल्फर कोटेड युरिया मधून नायट्रोजन हळूहळू बाहेर पडत असतो. तसेच यामध्ये ह्युमिक ऍसिड असल्यामुळे तो जास्त काळ टिकू शकतो.
समजा तुम्ही 15 किलो सल्फर कोटेड युरियाचा वापर केला तर सध्याच्या निमकोटेड 20 किलो युरिया इतका फायदा यापासून मिळतो असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे हा नवीन युरिया गोल्डचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असे सांगितले जात आहे.