Tourist Place:- आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान बनवत असतात. जर आपण पर्यटन स्थळांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये भरपूर ठिकाणी निसर्गाने भरभरून दिलेली अशी पर्यटन स्थळे असून वर्षातील बाराही महिने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पर्यटन स्थळांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण अशा पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी आतूर झालेले असतात व त्या पद्धतीने योजना देखील बनवतात.
म्हणून तुम्हाला देखील या हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट द्यायची इच्छा असेल तर तुमच्याकरिता कोणती पर्यटन स्थळे ही फायद्याची आणि कमीत कमी खर्चात फिरता येऊ शकतील असे ठरतील त्याबद्दलची माहिती घेऊ.
महाराष्ट्रातील हिवाळ्यात फिरता येतील अशी काही पर्यटन स्थळे
1- पाचगणी– पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते व ते सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ आहे. या ठिकाणी आल्हाददायक हवामान असल्यामुळे हवा फेरपालटकरिता या ठिकाणी जाणे खूप महत्त्वाचे ठरू शकते. दोन दिवसाची ट्रिप जर तुम्हाला आयोजित करायची असेल तर पाचगणी हे ठिकाण खूप महत्त्वाचे ठरते.
महाबळेश्वर पासून 20 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून याठिकाणी पारशी लोकांनी बांधलेले बंगले आज देखील आपल्याला आकर्षित करून घेतात. या ठिकाणी असलेल्या खोलचखोल दऱ्या तसेच धबधबे, कमलगड तसेच किडीज पार्क व टेबल लँड आणि पाचगणीच्या गुंफा प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहेत.
2- भंडारदरा– अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये प्रवरा नदीच्या तीरावर हे भंडारदरा वसलेले असून अहमदनगर पासून साधारणपणे 155 किलोमीटर व मुंबईपासून 185 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील जे काही उंच शिखर आहे
त्यापासून जवळच भंडारदरा हे ठिकाण असून या ठिकाणची हिरवी झाडे तसेच डोंगरांची कडे व विस्तीर्ण जलाशय आणि थंड हवा या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकते. या ठिकाणचे भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा मुख्य आकर्षण म्हणून ओळखले जातात.
3- माथेरान– माथेरान हे एक हिल स्टेशन असून माथेरानची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाची मिनी ट्रेन पर्यटकांचे खास आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी घनदाट झाडी आणि लाल पायवाटा खूप महत्त्वाच्या असून सहलीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणचा सर्वात योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च हा होय. ही सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेपासून जरा वेगळी झालेली डोंगररांग असून उंच उंच डोंगररांग ओळखले जाते.
4- चिखलदरा– अमरावती जिल्ह्यात मेळघाटचा पूर्व वनप्रदेशाला चिखलदरा म्हणून ओळखले जाते व साधारणपणे या ठिकाणी वर्षभर उष्ण तापमान असणाऱ्या विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे.
या ठिकाणी जेव्हा तुम्ही घनदाट अशा जंगलांमधून भटकंती करतात तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या उंच अशा पंचबोल पॉईंटच्या खोल दऱ्याखोऱ्यामधून वाघाची डरकाळी ऐकू येते. तसेच या ठिकाणी असलेल्या आल्हाददायक वातावरण मनाला भावून जाते.
5- तोरणमाळ– हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांच्या चौथ्या पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून 3770 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर तोरणा देवीचे मंदिर असून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नाव पडले असे म्हटले जाते.
अहिराणी बोली भाषेचे लाडके हिल स्टेशन म्हणून देखील तोरणमाळ ओळखले जाते. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख शहर आणि महामार्गांपासून दूर अशा अलिप्त ठिकाणी तोरणमाळ असल्यामुळे याला एक वेगळे महत्त्व प्राप्त होते.
6- म्हैसमाळ– औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून म्हैसमाळ प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर याला मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून देखील ओळखतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसते. म्हैसमाळ येथे असलेला व्ह्यू पॉइंट पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून या ठिकाणी असलेली हिरवीगार झाडे आणि लहरी टेकड्यांमुळे हे ठिकाण एक नंदनवन आहे. या दिवसांमध्ये या ठिकाणी तुम्हाला निसर्गाची शांतता आणि एकांत अनुभवता येतो.