Business Success Story:- मनामध्ये कुठल्याही गोष्टींविषयी काही कल्पना किंवा अंदाज आपण बांधत असतो. अशा प्रकारच्या कल्पना या स्वतःच्या आयुष्याबद्दल असतात किंवा आयुष्यामध्ये एखादा व्यवसायाबद्दल असतात.
म्हणजेच कल्पना या अनेक प्रकारच्या असू शकतात. परंतु अशा कल्पनांना सत्यामध्ये उतरवणे खूप कमी व्यक्तींना साध्य होते. कारण जर तुम्हाला कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायचे असेल तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे असते व त्याकरिता लागणारी आवश्यक कष्ट उपसणे तेवढेच महत्त्वाचे असते.
तेव्हाच कल्पना सत्य स्वरूपात येऊ शकते. याच मुद्द्याला धरून जर आपण अर्जुन अहलुवालिया यांची यशोगाथा पाहिली तर ते आज दोन हजार कोटी रुपयांच्या स्टार्टअप कंपनीचे मालक आहेत. परंतु जर आपण या कंपनीची सुरुवात पाहिली तर ती त्यांना त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीकडून जी छोटीशी कल्पना मिळाली त्या माध्यमातून झालेली आहे.
अर्जुन अहलुवालिया यांची यशोगाथा
जर आपण अर्जुन यांची यशोगाथा पाहिली तर ते अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी एका प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये काम करत होते. त्या ठिकाणी त्यांना पगार देखील उत्तम मिळत होता. परंतु या नोकरीमध्ये मन न लागल्याने त्यांनी नोकरी सोडण्याचे धाडस केले व साधारणपणे सहा वर्ष अगोदर ते भारतामध्ये परतले.
भारतामध्ये आल्यानंतर मात्र काय करावे हा विचार सुरू असतानाच महाराष्ट्र मध्ये ते आले व त्यांनी सहा महिने एका गावात राहायला सुरुवात केली.
सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजांचा खूप तपशीलवार असा अभ्यास केला. या कामासाठी त्यांनी त्यांच्या कॉलेजमधील एक मित्राला देखील सोबत घेतले व या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला.
त्यांना व्यवसायाची कल्पना कशी सुचली?
हे काम करत असताना त्यांच्या घरी काम करण्यासाठी एक मोलकरीण यायची व त्यांच्याकडूनच त्यांना व्यवसायाची कल्पना मिळाली. त्याचे झाले असे की त्यांच्याकडे काम करणारी मोलकरीण ही मुंबईतील धारावी या ठिकाणी राहणारी होती.
या मोलकरणीने मोबाईल फोन घेण्यासाठी एका खाजगी वित्तीय सेवा कंपनीच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. बस याच गोष्टीवरून त्यांना त्यांच्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांना वाटले की प्रत्येकाला छोट्या-मोठ्या कारणासाठी कर्ज लागते व असे कर्ज घेताना बरेच व्यक्ती सावकारी पाशामध्ये अडकतात. त्यामुळे असे लोकांना मदत होईलच परंतु ते सावकारी पाशात अडकू नये म्हणून काय योगदान देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
तसेच याबाबतीत कुठला व्यवसाय किंवा कुठली गोष्ट आपल्याला करता येईल याचा विचार करत असताना त्यांना त्यांचे शिक्षण देखील कामी आले. त्यांनी टेक्सास ए अँड एम विद्यापीठातून फायनान्सची पदवी घेतलेली होती
व त्यामुळे त्यांना अर्थशास्त्र उत्तम माहिती होते. म्हणून त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून किंवा सावकारी पाशात न अडकू देता कर्ज कसे मिळेल यासाठी काम करायचे ठरवले व स्वतःच काहीतरी करावे हे निश्चित केले.
त्याकरिता त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आठ महिन्याचा एक पायलट प्रोजेक्ट केला व त्यानंतर ॲग्री फिनटेक फर्म जय किसानची सुरुवात केली. विशेष म्हणजे या त्यांच्या जय किसान फर्मच्या माध्यमातून गरज असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत आहेत.
अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या कंपनीचे सुरुवात केली व या कंपनीला ए सिरीज मध्ये $30 दशलक्षाचा निधी आणि बी सीरिजमध्ये अतिरिक्त 398 कोटी एवढा निधी मिळाला आहे. सध्या या कंपनीचे व्हॅल्युएशन जर पाहिले दोन हजार कोटी रुपये पर्यंत वाढले आहे.
एवढेच नाही तर अर्जुनवालिया यांच्या या कंपनीला ब्लूम व्हेंचर्स, अकराम वेंचर्स, मारिया असेट, वेंचर्स पार्टनर्स आणि यारा जीएमओ यासारख्या प्रमुख गुंतवणूकदारांनी फंडिंग फेरीमध्ये सहभागी होऊन अर्जुन अहलुवालिया यांच्या या उपक्रमावर विश्वास व्यक्त केला आहे.