Farmer Success Story:- शेतीचे आता पारंपारिक स्वरूप काळाच्या ओघांमध्ये मागे पडले असून शेतकरी आता आधुनिक दृष्टिकोनातून व तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या पिकांची लागवड करून शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून यशस्वी करताना आपल्याला दिसून येत आहेत.
प्रामुख्याने शेतकरी आता बाजाराचा अभ्यास करून जे विकेल तेच पिकवण्याचा ध्यास घेऊन शेती करत असल्यामुळे निश्चितच भरघोस उत्पादन हाती येत आहे. परंतु आर्थिक नफा देखील चांगला मिळताना दिसून येत आहे.
हवामान बदलानुसार पिकपद्धतीत बदल करणे ही काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने बदल केल्यामुळे नक्कीच फायदा होताना दिसत आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील
दत्तराव महादवाड या शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी पारंपारिक शेती सोडून अमेरिकेत येणाऱ्या चिया सीड्स या पिकाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. डोंगरगाव शिवारामध्ये सध्या हे पीक बहरलेले असल्याचे चित्र असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील हा चर्चेचा विषय ठरला आहे.
दत्तराव यांना कसा सुचला चिया सीड लागवडीचा पर्याय
दत्तराव महादवाड हे शेतकरी सहलींमध्ये सहभागी झालेले होते व तेव्हा या सहलींच्या माध्यमातून ते मध्य प्रदेश, तसेच राज्यातील तुळजापूर अशा विविध ठिकाणी ते गेले होते. या सहली दरम्यान त्यांनी शेतीविषयक अनेक माहिती मिळवली व पाहणी देखील केली.
यावेळी ते मध्यप्रदेश राज्यातील निमोचन या गावी गेलेले होते व त्या ठिकाणी त्यांनी चीया सीडची शेती बघितली. त्या ठिकाणी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडी बाबत संपूर्ण माहिती घेतली.
कमीत कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळवून देणाऱ्या चिया शेतीवर त्यांनी चांगला अभ्यास केला व हा प्रयोग यशस्वी करायचे ठरवले व डोंगरगाव मध्ये यशस्वी देखील करून दाखवला.
एका एकरमध्ये केली लागवड
दत्तराव यांनी त्यांच्या एका एकर क्षेत्रामध्ये तीन किलो बियाण्याची पेरणी केली व आता त्यांच्या शेतामध्ये हे पीक जोमात बहरले असून साधारणपणे एका एकरात आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
यामध्ये खर्चाचा विचार केला तर बियाण्यावरील खर्च वगळता कुठल्याही खताची गरज या पिकाला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
त्यामुळे अगदी कमीत कमी खर्च या पिकासाठी लागतो व उत्पादन मात्र भरघोस निघते. चिया सीड्स हे पीक कमी खर्चात भरघोस उत्पादन देणारे पीक असल्याने 90 दिवसात दोन लाखांचा नफा ते देते.
चिया सीड्स विक्रीसाठी कुठे आहे बाजारपेठ?
चिया सीड्स विक्रीकरिता जर बाजारपेठ बघितली तर ती राज्यातील नासिक तसेच तुळजापूर या ठिकाणी असून तीस हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव या ठिकाणी या पिकाला मिळतो.
या पिकाला बाजार भाव चांगला मिळत असल्यामुळे एकरी 110 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा देखभालीचा खर्च न करता दोन लाखाचे उत्पादन मिळणार असल्याचे देखील दत्तराव महादवाड यांनी सांगितले.