Watermelon Crop Varieties:- कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण खूप महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक गोष्टींनी वेळच्यावेळी व्यवस्थापनाच्या योग्य त्या पद्धती अवलंबून भरघोस उत्पादन आपल्याला मिळवता येते.
तसेच यामध्ये पिकांची लागवडीपासून ते आंतरमशागतीच्या कामांपर्यंतच्या सर्व बाबी अगदी वेळेत पूर्ण करणे देखील खूप गरजेचे असते. परंतु यासोबत भरघोस उत्पादनामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते त्या पिकाचे निवडलेले वाण हे होय.
पिकांची लागवड करताना जर बियाणे दर्जेदार व जातिवंत असेल तर त्यापासून निघणारे उत्पादन देखील भरघोस निघते. मग ते फळबागा असो किंवा भाजीपाला पिके. या अनुषंगाने जर आपण टरबूज या पिकाचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात टरबूजचे मागणी असते व कमीत कमी वेळेत चांगले आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता या पिकात आहे.
परंतु जर तुम्ही टरबूज या पिकाची सुधारित जातींची लागवड केली नाही तर मात्र उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो. याकरिता जर तुम्हाला टरबूज लागवड करायची असेल तर सुधारित जातींची लागवड करणे खूप गरजेचे आहे.
या अनुषंगाने या लेखामध्ये आपण टरबुजाच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊ. ज्या वाणांच्या किंवा जातींच्या लागवडीतून टरबूज पिकाचे हेक्टरी 200 ते 250 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
या आहेत टरबुजाच्या सुधारित जाती
1- शुगर बेबी– टरबुजाची ही सुधारित जात भरघोस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून लागवडीनंतर 95 ते 100 दिवसांमध्ये काढणीला येते. साधारणपणे शुगर बेबी जातीच्या एका टरबुजाचे वजन चार ते सहा किलो पर्यंत असते.
शुगर बेबी जातीच्या टरबूजामध्ये बियांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. या जातीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एका हेक्टरमध्ये 200 ते 250 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणे शक्य आहे.
2- अर्का ज्योती– टरबुजाची ही जात देखील भरघोस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून अर्का ज्योती वाणाच्या एका फळाचे वजन सहा ते आठ किलोपर्यंत असते. या जातीचे टरबूज जास्त कालावधीपर्यंत टिकते म्हणून साठवणुकीसाठी देखील हे फायद्याचे आहे. टरबुजाच्या या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 300 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
3- डब्ल्यू 19 व्हरायटी– टरबुजाची ही जात उच्च तापमानामध्ये देखील टिकाव धरून राहू शकते. या जातीचे टरबूज अतिशय गोड असते व ही जात लागवडीनंतर साधारणपणे 75 ते 80 दिवसांमध्ये काढणीस तयार होते. टरबुजाच्या या जातीपासून देखील भरघोस उत्पादन मिळते.
4- पुसा बेदाणा– टरबुजाच्या या जातीचे फळे खायला खूप गोड व चविष्ट असतात व मधील गर हा गुलाबी व अधिक रसाळ असतो. टरबुजाचा हा वाण लागवडीनंतर 85 ते 90 दिवसात काढणीस तयार होतो.
5- आशायी यामाटो– टरबुजाची ही जात जपानी असून या जातीच्या एका फळाचे वजन साधारणपणे सरासरी सात ते आठ किलोपर्यंत असते. तसेच या जातीच्या टरबुजाची साल ही हिरवीगार व धारदार असते व यामध्ये बियांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. टरबुजाच्या या जातीपासून साधारणपणे प्रती हेक्टर 225 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.