Tomato Varieties:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली जाते. भाजीपाला पिकांच्यामध्ये टोमॅटो हे पीक खूप महत्त्वाचे पीक असून नाशिक जिल्ह्यामध्ये देखील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये टोमॅटोचे उत्पादन आता शेतकरी घेतात.
मागच्या वर्षी आपण बघितले की कधी नव्हे एवढे बाजारभाव टोमॅटोला मिळालेत व टोमॅटो पिकाच्या माध्यमातून अनेक शेतकरी कर्जमुक्त झालेच. परंतु काही शेतकरी कोट्यावधी झाल्याच्या देखील आपण बातम्या ऐकल्या होत्या.
साधारणपणे उन्हाळी टोमॅटो लागवडीमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात टोमॅटोची लागवड बरेच शेतकरी करत असतात. परंतु टोमॅटो लागवडीकरिता अगोदर टोमॅटोची रोपवाटिका तयार करणे गरजेचे असते व त्याची तयारी साधारणपणे शेतकरी बंधू मार्च ते एप्रिल महिन्याच्या कालावधीत करतात.
त्यामुळे साहजिकच टोमॅटो पासून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर रोपवाटिका तयार करताना टोमॅटोच्या दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे.
तसे पाहायला गेले तर टोमॅटो पिकाचे अनेक कंपन्यांचे वाण आहेत. परंतु यामध्ये ‘अर्का रक्षक’ या टोमॅटोच्या वाणाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. टोमॅटोच्या भरघोस उत्पादनाकरिता अर्का रक्षक हे टोमॅटो वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणारे आहे.
टोमॅटोचे अर्का रक्षक हे वाण देईल भरघोस उत्पादन
इतर पिकांप्रमाणेच टोमॅटो पिकावर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. परंतु यामध्ये टोमॅटोची अर्का रक्षक ही जात पाहिली तर ती रोगप्रतिकारक्षम असून अधिक उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते.
ही टोमॅटोची जास्त उत्पादन देणारी एफ-1 संकरित जात म्हणून ओळखले जाते व ती प्रमुख रोगांना प्रतिकारक्षम असल्याने रोगांना बळी पडत नाही. तसेच टोमॅटो वरील रोगांचा विचार केला तर यामध्ये लिफ कर्ल म्हणजेच पर्णगुच्छ नावाचा रोग मोठ्या प्रमाणावर पडतो व यासोबतच टोमॅटो वर भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो.
या रोगामुळे टोमॅटो पिकाच्या उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होतो. परंतु अर्का रक्षक या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात या रोगांना बळी पडत नाही. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर इतर ज्या काही टोमॅटोच्या जाती आहेत
त्यांच्या तुलनेमध्ये अर्का रक्षक ही टोमॅटोची जात तुलनेने जास्त रोगप्रतिकारक्षम आहे. तसेच उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील ही जात इतर टोमॅटो जातींच्या तुलनेमध्ये सरस आहे. अर्का रक्षक ही जात प्रामुख्याने लागवडीनंतर 140 दिवसांमध्ये काढणीला येते.
साधारणपणे योग्य व्यवस्थापन व सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८० टना पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे. तसेच अर्का रक्षक वाणाच्या टोमॅटोचे फळ हे आकाराने मोठे आणि लाल भडक रंगाचे असते.
टोमॅटोचे फायदेशीर इतर वाण
याशिवाय अर्काचे अन्य वाण पाहिले तर यामध्ये अर्का अभिजीत ही जात देखील खूप फायद्याची असून हे निर्यातीसाठी उत्तम असे वाण आहे. साधारणपणे हे वाण 140 दिवसात तोडणीला येते.
याशिवाय अर्का विशेष हे टोमॅटो वाण देखील शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असून हेक्टरी साडेसातशे ते 800 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता यामध्ये आहे. याशिवाय अर्का अभेद हे टोमॅटोचे संकरित वाण असून लागवडीनंतर साधारणपणे 140 ते 150 दिवसांमध्ये काढणीस तयार होते
व एका फळाचे वजन 90 ते 100 ग्रॅम पर्यंत असू शकते. या जातीचे हेक्टरी 70 ते 75 टन उत्पादन मिळते. रोगप्रतिकारक शक्तीच्या दृष्टिकोनातून ही जात देखील खूप फायद्याचे आहे.