Farmer Success Story:- शेतीची पारंपारिक पद्धत आणि पारंपारिक पिकांची लागवड आता मागे पडली असून शेतकरी कमीत कमी कालावधीत येणारी व उत्पादन खर्च कमी असलेली पिके घेण्यावर जास्त प्रमाणात भर देताना आपल्याला सध्या दिसून येत आहेत.
त्यामुळे बरेच शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करून कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. कारण कमी कालावधीतील पिके जर वर्षभर टप्प्याटप्प्याने घेण्याचे नियोजन केले तर बाजारभावाची जोखीम कमी व्हायला मदत होते व वर्षभर हातात चांगला पैसा येत राहतो
अशा प्रकारचा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांना असल्याने आता शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची कमी कालावधीत येणारी पिकांची लागवडीने चांगला पैसा मिळवत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून आपण आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी या गावच्या
प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर यांची शेती पद्धत पाहिली तर यांनी 25 गुंठे क्षेत्रामध्ये बीन्स या वेल जातीच्या फरसबीची लागवड केली असून या माध्यमातून त्यांनी भरघोस उत्पादन देखील मिळवले आहे. त्यांचीच यशोगाथा आपण थोडक्यात बघणार आहोत.
फरसबी उत्पादनातून मिळेल भरघोस नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी या गावचे प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर यांनी त्यांच्या घरच्या 25 गुंठे शेतामध्ये बीन्स या वेल जातीच्या फरसबीची लागवड केली असून या माध्यमातून त्यांनी भरघोस उत्पादन मिळवण्यात यश प्राप्त केलेले आहे.
सध्या त्यांनी लागवड केलेल्या फरसबीचे उत्पादन निघायला सुरुवात झाली असून प्रत्येक तोळ्याला दोनशे किलो इतके उत्पादन निघत आहे व बाजारपेठेत फरसबीला 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्याने चांगला पैसा त्यांच्या हातात सध्या येत आहे.
सध्या त्यांच्या शेतातील फरसबीची तोडणी चार ते पाच दिवसानंतर होत असून या सगळ्या फरसबीच्या उत्पादन कालावधीमध्ये त्यांना खर्च वजा करता दोन ते अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल असे देखील त्यांनी म्हटले. कमी कालावधीतील पिके जर वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड करून त्यांचे उत्पादन घेण्याचे नियोजन जर केले तर बाजारभावाची जोखीम कमी होते
व त्या दृष्टीने फ्रेंच बीन म्हणजेच फरसबी हे पीक उत्तम असून त्या दृष्टिकोनातून मुरलीधर सिनलकर यांनी फरसबी चे नियोजन केलेले आहे. विशेष म्हणजे अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांना सक्षम करण्यास या पिकाचा मोठा हातभार लागलेला आहे.
फ्रेंच बीन म्हणजेच फरसबी या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे याला बाराही महिने चांगली मागणी असते. लग्न सराईच्या कालावधीमध्ये तसेच दसरा,दिवाळी व गणपती या कालावधीमध्ये याला बाजारपेठेत चांगली मागणी असते. चांगला गर असलेल्या तसेच कोवळ्या व मध्यम आकाराच्या शेंगांना बाजारपेठेत चांगला दर मिळतो व मागणी देखील चांगली असते.
कसा असतो फरसबीचा हंगाम व लागवडीचे नियोजन?
फरसबीचे पीक हे वर्षभर घेण्यात येणारे पीक असून वानानुसार सुमारे पिकाचा कालावधी सहा महिन्याचा असतो. लागवडीनंतर साधारणपणे पन्नास दिवसानंतर उत्पादन मिळायला सुरुवात होते व तीन बहार आपल्याला घेता येतात.
एक मजूर दिवसभरात फरसबीच्या 45 किलो शेंगांची तोडणी करू शकतो. या पिकावरील जर रोग व अळीचा प्रादुर्भाव पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने करपा आणि नागअळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. जर आपण मुरलीधर सिनलकर यांचे नियोजन पाहिले तर ते साडेचार फुटाचा बेडचा वापर लागवडीसाठी करतात व त्यावर मल्चिंगचा वापर देखील करतात.
एका एकरा करिता दोन टन कोंबडी खत आणि सहाशे किलो गांडूळ खताचा वापर केला जातो. तसेच सिनलकर गोमूत्र आणि जैविक खताच्या वापरावर जास्त प्रमाणात भर देतात. या पिकाला पाण्याची शाश्वत सोय असणे गरजेचे आहे. जर या पिकाला पाण्याची कमतरता भासली तर त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या वाढीवर व मिळणाऱ्या उत्पादनावर होऊ शकतो.