शेतीमध्ये इतर पिकांपेक्षा जर भाजीपाला लागवड केली तर कमीत कमी कालावधीमध्ये आणि इतर पिकांच्या तुलनेत कमीत कमी खर्चात लाखात उत्पादन देण्याची क्षमता भाजीपाला पिकांमध्ये असते. त्यामुळे बरेच शेतकरी दोन किंवा तीन एकर क्षेत्र असेल तर एकाच प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड न करता दोन ते तीन पिकांची निवड लागवडीसाठी करतात व यामध्ये मधून लाखोत नफा मिळवताना आपल्याला दिसून येतात.
शेतीमध्ये येऊ घातलेले आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून देखील भाजीपाला पिकांचे भरघोस व दर्जेदार उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी झालेले आहेत. तसेच बरेच उच्चशिक्षित तरुण आता नोकऱ्या नसल्यामुळे शेतीकडे वळत आहेत
व अशाच पद्धतीने भाजीपाला लागवडीतून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून येते. अगदी याच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील शिवराजपुर येथील उच्चशिक्षित असलेले संजू कुथे व त्यांच्या पत्नी रसिका यांनी भाजीपाला लागवडीतून लाखोत नफा मिळवण्याची किमया साध्य केली आहे.
भाजीपाला शेतीतून मिळवली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील शिवराजपुर येथील संजू कुथे आणि रसिका कुथे हे उच्चशिक्षित दांपत्य आहे. संजू यांनी डीएड पूर्ण केलेले आहे तर रसिका यांनी मराठी व इतिहास या विषयांमध्ये एमए पूर्ण केलेले आहे.
परंतु उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला व भाजीपाला पिकांच्या उत्पादनातून वर्षाकाठी लाखात आर्थिक उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली.
साधारणपणे देसाईगंज तालुका किंवा शिवराजपुर हा परिसर पाहिला तर या ठिकाणी बारमाही पाण्याच्या सोयी असल्याने आणि मार्केट सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे याचा फायदा या दांपत्याला मोठ्या प्रमाणात झाला.
या भाजीपाला पिकांची केली लागवड
संजू कुथे हे दरवर्षी खरीप हंगामामध्ये 20 एकर शेती भाडेतत्त्वावर घेतात व यामध्ये मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड ते करत असतात. त्यांची घरची वडिलोपार्जित तीन एकर शेती असून या क्षेत्रावर ते विविध पिकांची लागवड करतात.
या तीन एकरामध्ये त्यांनी पाऊण एकर कारले लागवड बेड पद्धतीने केली व पाऊण एकर मध्ये मिरची तर पाव एकरात भेंडीची लागवड केलेली आहे. यामध्ये दीड लाखाची कारल्याची विक्री आतापर्यंत त्यांनी केली आहे व एक लाखापेक्षा जास्त इतर भाजीपाला पिकांची विक्री त्यांनी केलेली आहे.
सध्या या भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत असून जवळच्या मार्केटमध्ये ते व्यापाऱ्यांच्या मार्फत विकले जात आहे. धान पिकापेक्षा भाजीपाला पिकांची शेती फायद्याचे असल्याचे देखील संजू कुथे यांनी सांगितले.
अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता कुठलीही लाज न बाळगता शेतीतून बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केले तर लाखात उत्पादन मिळू शकते हे कुथे दांपत्याने दाखवून दिले आहे.