Farmer Success Story:- शेतीमध्ये सध्या अनेक नवनवीन प्रयोग शेतकरी करत असून वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड आणि त्या फळांच्या योग्य विक्री व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करताना दिसून येत आहेत.
तसेच बरेच शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण मध्य प्रदेश राज्यातील अलीराजपूर येथील एका शेतकऱ्याची शेती पद्धत पाहिली तर एक फायदेशीर शेती कशी केली जाते? याचा अनुभव आपल्याला येतो.
या शेतकऱ्याने असलेल्या वडिलोपार्जित आंब्याच्या बागेत वाढ करून आपली वैशिष्ट्यपूर्ण रीतीने आंब्याची बाग आता तयार केलेली असून 26 जातीच्या आंब्यांची लागवड त्याने शेतामध्ये केलेली आहे
व या शेतकऱ्याचे नाव आहे युवराज सिंग हे होय.हा शेतकरी आंब्याच्या बाबतीत विविध प्रकारचे प्रयोग करतो व या माध्यमातून आंब्याचे भरघोस उत्पादन घेऊन लाखात नफा देखील दरवर्षी मिळवत आहे.
आंब्याच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश राज्यातील अलीराजपुर जिल्ह्यात असलेल्या छोटा उंडवा गावातील शेतकरी युवराज सिंग यांनी त्यांचे वडील व आजोबांकडून शेतीची प्रेरणा घेऊन शेती करायला सुरुवात केली.
त्यांच्या आजोबांच्या काळापासून त्यांच्या शेतामध्ये आंब्याच्या बागा असल्याने आंब्यांच्या नियोजनासाठीचे असलेली महत्त्वाची कामे जवळून त्यांनी अनुभवली. त्यामुळे वडील व आजोबांकडून त्यांना शेतीची प्रेरणा मिळाली व त्या प्रेरणेतूनच त्यांनी गेल्या सात वर्षांपूर्वी शेतामध्ये पाचशे आंब्यांची रोपे लावली.
या माध्यमातून त्यांनी वडिलोपार्जित असलेली आंब्याची शेती टिकवण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेच परंतु यामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञान व कल्पनांचा वापर करून शेतीला आधुनिकतेची जोड दिली. आंब्याच्या शेतीत वेगळेपण आणत असताना त्यांनी बागेत लंगडा, केसर तसेच चौसा,
सिंदुरी, हापुस आणि राजापुरी इत्यादी प्रजातींच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. युवराज सिंग यांनी आंब्याच्या उत्पादनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हातखंडा मिळवला आहे की विविध ठिकाणी होणाऱ्या आंबा महोत्सवांमध्ये ते गेल्या दहा वर्षापासून प्रथम पारितोषिक पटकावत आहेत.
आंब्याच्या बागेत केली आहे नूरजहान नावाच्या आंब्याची लागवड
आंब्याच्या बागेत विविध प्रयोग करत असताना त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी काठीवाड्यातून नुरजहा नावाच्या आंब्याचे कलम करून रोप आणले होते व त्यांनी त्यांच्या बागेमध्ये त्याची लागवड केली.
आज त्या रोपाचे आंब्याच्या झाडात रूपांतर झाले असून या झाडापासून उत्पादित होणाऱ्या एका आंब्याचे वजन सुमारे तीन किलो इतके आहे व हा आंबा बाजारामध्ये तब्बल 1000 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो व त्याला मागणी देखील जास्त असते.
ऑनलाइन विक्रीतून कमावले चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न
मागच्या वर्षी त्यांनी चार ते पाच लाख रुपयांचे आंबे फक्त ऑनलाईन प्लेटफॉर्मच्या माध्यमातून विक्री केले होते. याशिवाय ते पाच किलो आंब्याची पॅकिंग बॉक्समध्ये करून थेट बाजारपेठेत देखील विक्री करतात व लोकांना देखील पोहोचवतात.
तसेच अलीराजपूर ही एक आंब्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी देखील युवराज सिंग यांनी पिकवलेला आंबा मोठ्या प्रमाणावर विकला जातो व त्यांना इतर ठिकाणी आंबा विकण्यासाठी जाण्याची गरज भासत नाही.