सध्या सगळीकडे महिला वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड तसेच कुरडया, शेवया बनवण्याची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे व ही लगबग ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी महिला वर्गाला खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागते व यामध्ये वेळ देखील भरपूर प्रमाणामध्ये जातो.
त्यातल्या त्यात कुरडया तयार करण्याचे काम म्हटले म्हणजे हे खूप जिकरीचे काम असून साधारणपणे गव्हाच्या चिकापासून कुरडई बनवली जाते व कुरडया बनवण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोऱ्यांचा वापर केला जातो.
यामध्ये गव्हाचा चीक सोऱ्याच्या माध्यमातून दाबला जातो व या माध्यमातून एक कुरडई तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व कमीत कमी कुरडया बनवण्यासाठी तीन ते चार महिला आवश्यक असतात. परंतु आता महिला वर्गासाठी एक आनंदाची बातमी असून कुरडया बनवायच्या असतील तर आता लागणारी मेहनत कमी होणार असून वेळ देखील कमी लागणार आहे.
कारण कमीत कमी वेळेमध्ये व कमीत कमी खर्चात व मेहनतीत कुरड्या करता येतील अशा पद्धतीचे मशीन संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील ऑटोमेशन रोबोटिक विभागातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. विजय शिवाजीराव गडाख यांनी तयार केले असून त्यांच्या या मशीनला भारत सरकारच्या कार्यालयाकडून पेटंट देखील मिळाले आहे.
डॉ. विजय गडाख यांनी बनवले कुरडया तयार करण्याचे मशीन
संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील ऑटोमेशन व रोबोटिक्स विभागातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. विजय शिवाजीराव गडाख यांनी नूडल्स एक्सट्रूडर यंत्र म्हणजेच कुरडया बनवण्याचे यंत्र तयार केली असून या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट देखील मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. गडाख हे मूळचे पारेगाव बुद्रुक या गावचे असून ग्रामीण भागातील महिला वर्गाच्या जीवनाविषयी त्यांना संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे कुरड्या तयार करण्याच्या बाबतीत महिलांचे कष्ट करण्याच्या बाबतीत त्यांनी हे नवीन संशोधन केले. सध्या सोऱ्याच्या माध्यमातून कुरड्या तयार केल्या जातात.
परंतु आता त्याला पर्याय म्हणून हे यंत्र बनवण्यात आलेले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्रामध्ये गव्हाचा चीक ऑटोमॅटिक दाबला जातो व कुरडई देखील ऑटोमॅटिक पद्धतीने चाळली जाते. त्यामुळे एका मिनिटांमध्ये कमीत कमी पाच ते सहा कुरडया तयार केल्या जातात.
त्यामुळे नक्कीच कुरड्या तयार करताना लागणारा वेळ आणि कष्ट वाचणार हे मात्र निश्चित. या नवीन यंत्रामुळे आता महिलांचा वेळ आणि श्रम वाचणार असून नक्कीच महिला वर्गाला दिलासा मिळणार आहे.