Ahmednagar Loksabha : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नेमके चित्र अद्याप समोर आले नसले तरी भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याच लढत होईल, असे मानले जात आहे. विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे लंके यांचा शरद पवार गटातील प्रवेश आणि उमेदवारी जाहीर होणे लांबले आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांसोबत मतदारांनीही या दोघांत लढत होणार, हे गृहित धरून आडाखे बांधण्यास सुरवात केली आहे. या दोघांच्याही फायद्या तोट्याची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. कार्यकर्ते, मतदार आणि राजकीय विश्लेषक यांच्या चर्चेतून यातील काही गोष्टी समोर आल्या आहेत.
विखे पाटील यांची जमेची बाजू
यावेळी उमेदवारी मिळणार की नाही, अशी स्थिती निर्माण झालेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून उमेदवारी मिळविण्यात आलेले यश ही विखे यांची जमेची बाजू मांडली जाते. गेल्यावेळी ते नव्याने भाजपमध्ये आले होते आणि प्रथमच लोकसभा निवडणूक लढवित होते. तरीही सात लाखांवर मते मिळाली. आता पाच वर्षांत त्यांचा संपर्क वाढला, पक्षाची यंत्रणाही वाढली. सोबत मोदींची गॅरंटी आहे, पक्षाचे नेटवर्क आणि स्वत:ची खासगी यंत्रणा आहे.
विखेंसाठी तापदायक गोष्टी
यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत. एक तर स्वत: विखे पाटील यांच्यासंबंधीची वैयक्तिक नाराजी आणि दुसरी भाजप आणि केंद्र सरकारविरूद्धची नाराजी. अशा डबल नाराजीचा सामना विखे पाटील यांना प्रचारात करावा लागणार आहे. संपर्क नव्हता, मानसन्मान दिला नाही, असे सांगून कार्यकर्ते नाराज आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार आणि भाजपवर मतदारांचा मोठा वर्ग नाराज आहे. त्यांचीही समजूत काढून प्रचाराचे आव्हान विखे पाटील यांच्यापुढे आले.
लंके यांच्या जमेच्या बाजू
गेल्या काही काळापासून निवडणुकीच्या तयारीत असलेले लंके यांना विखे विरोधक म्हणून आणि आपला माणूस म्हणूनही डोक्यावर घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बऱ्याच भागात प्रचाराआधीच त्यांची हवा झाली आहे. भाजपच्या नाराजीचा त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय भाजपच्या कट्टर विरोधक असलेला मतदार आपोआपच लंके यांना मिळणार आहे. ही संख्याही कमी नाही. विखेंना विरोध म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांची यंत्रणा लंकेच्या पाठीशी राहील.
लंके यांच्यापुढील अडचणी
लंके यांच्यापुढे सर्वांत मोठी अडचण स्वत:ची संस्थात्मक यंत्रणा नसणे ही आहे. त्यांना पक्षाची यंत्रणा आणि जीवाभावाचे कार्यकर्ते यावर अलंबून राहावे लागणार. शिवाय पक्षाने उमेदवारी दिली तरीही नगर जिल्ह्याच्या अनुभव लक्षात घेता लंके यांना तालुक्यातील संस्थानिक मनापासून स्वीकारणार का? आपल्या भागात तयार होणारे नवे शक्तिकेंद्र त्यांना मान्य होणार का? हाही प्रश्नच आहे. तरूण, महिलावर्ग, ग्रामीण भागातून लंके यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत असले तरी शहरी सुशिक्षित मतदार त्यांना स्वीकारणार का? ही सुद्धा अडचण आहे.
अशा पद्धतीने या दोघांमध्ये सामना रंगण्याची चिन्हे असताना मत विभाजन होईल, असा तिसरा उमेदवार सध्या तरी रिंगणात, चर्चेत दिसत नाही. त्यामुळे सुमारे १९ लाख पैकी किती मतदार मतदान करणार आणि त्यातील किती मते कोणाकडे वळविता येणार, यावर विजयाची गणित अवलंबून राहील.