डाळिंब पिकांचा कर्दनकाळ आहे मर रोग! कराल ‘या’ उपायोजना तरच वाचेल डाळिंबाचा बाग, नाहीतर नुकसान अटळ

Ajay Patil
Published:

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड केली जाते व गेल्या काही वर्षापासून फळबाग लागवडीचे क्षेत्र हळूहळू वाढताना दिसून येत आहे. फळबागांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, संत्रा आणि अलीकडच्या कालावधीत ड्रॅगन फ्रुट इत्यादींचे लागवड क्षेत्र वाढलेले दिसून येते.

यामध्ये डाळिंब या फळबागाच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तसेच कळवण व सटाणा, देवळा या भागामध्ये डाळिंबाचे लागवड प्रचंड प्रमाणात होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये डाळिंबावर तेल्या आणि मर या दोन रोगांनी थैमान घातले व प्रचंड प्रमाणावर शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागा काढून टाकाव्या लागल्या.

हे दोन्ही रोग डाळिंब पिकावरील खूप घातक रोग म्हणून ओळखले जातात. यातील मर हा एक बुरशीजन्य रोग असून डाळिंब बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर यामुळे नुकसान होते. त्या अनुषंगाने या लेखात आपण डाळिंबावरील मर रोगाचे नियंत्रणासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय योजना व मर रोग आल्यानंतर करायच्या उपाययोजना इत्यादी बद्दल माहिती घेऊ.

 मर रोगाचे नियंत्रणाकरिता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना

1- सगळ्यात अगोदर तुम्हाला जर डाळिंबाची लागवड करायची असेल तर पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या हलक्या व मध्यम प्रतीच्या चुनखडी मुक्त जमिनीमध्ये लागवड करावी.

2- डाळिंबाची लागवड करण्याआधी जमीन नांगरून तिला चांगली तापू द्यावी.

3- तसेच डाळिंबाच्या लागवडीसाठी रोपांचा वापर करताना प्रामुख्याने ज्या बागांमध्ये रोग नाही अशा रोगविरहित बागांमधील गुट्टी पासून तयार केलेल्या रोपांचा वापर करावा.

4- लागवड करताना 4.5×3.0 मीटर अंतरावर करावी व यापेक्षा कमी अंतर ठेवू नये.

5- डाळिंबाची लागवड करण्यासाठी तुम्ही जे खड्डे तयार कराल ते लागवडीआधी कमीत कमी एक महिन्याअगोदर तयार करून ठेवावेत व त्यांना उन्हामध्ये चांगले तापू द्यावेत.

6- जेव्हा लागवड कराल तेव्हा उत्तम दर्जाची माती असेल तर वाळू आणि माती यांचे प्रमाण 1:1 इतके घ्यावे व त्यासोबतच 20 किलो शेणखत, दोन किलो गांडूळ खत तीन किलो निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्रॅम, ऍझोटोबॅक्‍टर 15 ग्रॅम आणि स्फुरद जिवाणू पंधरा ग्रॅम त्या खड्ड्यामध्ये टाकावे.

 अशा पद्धतीने ठेवावे पाण्याचे व्यवस्थापन

1- डाळिंब बागेसाठी पाण्याचे व्यवस्थापन करताना तुम्ही ज्या ठिकाणी डाळिंबाची लागवड केली आहे त्या ठिकाणचा बाष्पीभवनाचा दर काय आहे त्यानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे.

2- तसेच पाणी देताना जमीन कशा प्रकारची आहे म्हणजे जमिनीचा मगदूर कसा आहे याप्रमाणे पाण्याचा पुरवठा करावा.

3- ठिबकने जर पाण्याची सोय करत असाल तर एक दिवस आड किंवा दररोज पाणी न देता जमीन जेव्हा वाफसा स्थितीत येईल तेव्हाच पाण्याचे व्यवस्थापन करावे.

4- झाडांना पाणी देताना शिफारस केलेल्या मात्रेनुसारच पाणी द्यावे.

5- झाडांचा आकार जेव्हा मोठा होईल तेव्हा दोन ऐवजी चार ड्रीपरचा वापर करावा.

6- महत्वाचे म्हणजे ड्रीपर झाडापासून सहा इंच बाहेर असावेत.

7- तसेच पाण्याची बचत करण्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय आच्छादने वापरावेत.

 मर रोग आल्यास या उपाययोजना करा

1- सगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यावर जर मररोग आला तर या रोगाची लक्षणे दिसायला लागताच ज्या झाडाला याची लागण झालेली आहे ते झाड आणि निरोगी असलेले झाड यामध्ये तीन ते चार फूट लांबीचा चर खोदून घ्यावा.

2- मररोगाच्या प्रादुर्भावाने जर संपूर्णपणे झाड खराब झाले असेल तर ते खोदून काढून त्या झाडाची मुळे व त्या मुळाना लागलेली माती शेतामध्ये कुठेही पडून देता ती कापडाने किंवा पॉलिथिनने झाकून बागेच्या बाहेर लांब जाळून टाकावी. तसेच खोदण्यासाठी केलेला खड्डा निर्जंतुक करून नंतरच त्या ठिकाणी लागवड करावी.

3- बागेमध्ये जर या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब  तज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशकांची पाच ते दहा लिटर द्रावणाची झाडाच्या सभोवतालच्या निरोगी झाडासहीत भिजवन करून घ्यावी. अशा प्रकारची भिजवण वीस दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळेस करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe