Onion Crop Variety:- कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण पीक असून कांद्याची लागवड महाराष्ट्रात आता सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप आणि रब्बी हंगामामध्ये केली जाते. परंतु कांद्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कांद्याची प्रमुख समस्या म्हणजे कांदा हा जास्त दिवस साठवता येत नाही.
काही दिवसांनी कांदा हा खराब व्हायला लागतो व त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा आहे त्या बाजारभावात कांदा विकणे भाग पडते व त्यामुळे कधी कधी बाजार भाव कमी राहिले तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यातल्या त्यात टिकवणं क्षमतेचा विचार केला तर रब्बी हंगामातील कांदा हा बऱ्याच कालावधीपर्यंत टिकवता येणे शक्य आहे.
परंतु खरीप हंगामातील लाल कांदा मात्र जास्त दिवस टिकत नाही व लवकर खराब व्हायला लागतो. इतकेच काय तर त्याला अगदी दहा ते पंधरा दिवसात कोंब यायला लागतात व अशा कांद्याला बाजारामध्ये भाव देखील चांगला मिळत नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होते.परंतु आता शेतकऱ्यांना कांदा जास्त कालावधीकरिता साठवता यावा या दृष्टिकोनातून एक कांद्याचे नवीन वाण विकसित करण्यात आलेले असून साधारणपणे एक वर्षापर्यंत या वाणाचा कांदा खराब होत नाही.
महत्त्वाचे आहे कांद्याचे ॲग्रीफाउंड लाईट रेड-4 वाण
कांद्याचे हे नवीन वाण असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरणार आहे. कारण बरेच शेतकरी खरीप हंगामामध्ये लाल कांद्याचे उत्पादन घेतात. परंतु आपल्याला माहित आहे की लाल कांदा हा काही दिवसच चांगला राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या बाजारभावामध्ये कांदा विकावा लागतो.
अशा परिस्थितीत कांद्याचे ॲग्रीफाउंड लाईट रेड चार हे कांदा वाण कांदा साठवून ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार असून अधिक काळापर्यंत ते चांगले राहते. कानपूरच्या कृषी प्रादयोगीकी आणि संशोधन संस्थेने हे वाण विकसित केले असून अगदी सामान्य परिस्थितीत त्याला कोंब येत नाहीत.
या वाणाच्या कांद्याचा रंग फिकट लाल असतो व खाण्यासाठी तिखट असतो. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात म्हणजेच खरीप हंगामातील कांदा लागवडीसाठी कांद्याचा हा नवीन वाण शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल.
पावसाळी कांदा लागवड होईल फायद्याची
महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यामध्ये देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु जेव्हा पावसाळ्याच्या कालावधीत कांद्याचे लागवड केली जाते तेव्हा त्यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. अशा परिस्थितीत पावसाळ्यातील लाल कांद्याला ओलावा जास्त प्रमाणात मिळतो व लवकर त्याला कोंब फुटण्याची समस्या निर्माण होते.
याच एका कारणामुळे शेतकऱ्यांना जो बाजार भाव असेल त्यामध्ये लाल कांदा विकण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु आता ॲग्री फाउंड लाईट रेड चार वाणामुळे शेतकऱ्यांची या समस्येपासून सुटका मिळणार आहे व पावसाळी कांदा लागवड देखील शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे.