… म्हणून भाजपमध्ये फूट पडली नाही – फडणवीस

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणालाही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी झाली नाही आणि त्यामुळे पक्षाला कधीही अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागला नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

भाजपच्या ४४व्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी देशाच्या इतिहासात कधीही फूट न पडणारा आपला पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याचा दावा केला.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी पक्षाला पुढे नेण्याचे काम केले आहे. भाजपचे नेते कधीही स्वतःपुरते किंवा स्वार्थी राहिलेले नाहीत,

असे सांगून फडणवीस यांनी हा पक्ष कधीही कुणालाही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी स्थापन करण्यात आलेला नाही, तर देशाच्या हितासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

या पक्षाने नेहमीच आपल्या विचारसरणीनुसार काम केले आणि त्यात कधीही फूट पडली नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी अलीकडच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहामुळे पडलेल्या फुटीवर तिखट टीका केली.

महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’ आघाडी हे केवळ इंजिन आहे. यांना एकही डबा नाही. या इंजिनमध्ये बसायची जागादेखील नाही. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चालले आहे. सर्व इंजिन एका रांगेत उभे करून, हात वर करून आम्ही सोबत आहोत, असे सांगतात. मात्र पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचे, असे सुरू आहे.

त्यामुळे ज्या इंजिनमध्ये बसायलाच जागा नाही ते इंजिन काय कामाचे, असे ते म्हणाले. जागावाटपासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यातील ३३ जागांवर भाजप लढणार असा दावा आम्ही कधीच केला नव्हता, महायुतीत जागावाटपामध्ये मित्रपक्षांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे ज्या जागा मिळतील त्यावर आपण समाधानी असल्याचे फडणवीस म्हणाले. देशात लोकसभा निवडणुकीचे महापर्व सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार, सुप्रिया सुळे व रोहित पवारच दिसतात, जयंत पाटील आहेत कुठे ?, असा प्रतिप्रश्‍नही ‘फडणवीस्‌ यांनी माध्यमांद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe