भाजप नगरसेवकाच्या जाचास कंटाळून तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करुनही गाळा न मिळाल्याने हताश झालेल्या प्रभाकर मधुकर कर्नाटकी (वय 45) या व्यावसायिकाने नव्याने बांधण्यात आलेल्या गाळ्यातच अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या वाॅर्ड नंबर ७ चे याप्रकरणी भाजप नगरसेवक रमेश पाटील यांच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि शहरातील भगतसिंग चौकात कॅनॉलच्या कडेला पाटबंधारे खात्याच्या जागेमध्ये नवीन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. पूर्वी त्या जागेवर व्यावसायिकांचे लोखंडी गाळे होते. ते सर्व गाळे पाडून पुन्हा सिमेंटचे गाळे तयार करण्यात आले आहे.

गाळा मिळावा म्हणून प्रभाकर ऊर्फ बाळासाहेब कर्नाटकी (कालिकामाता मंदिराजवळ, वॉर्ड नंबर ७) यांनी रवी पाटील याला एक लाख रुपये रोख दिले होते. त्या बदल्यात दहा नंबरचा स्लॅबचा गाळा देण्याचे पाटील याने कबूल केले होते.

पाटील त्यांना नगरपालिकेच्या जागेत गाळा देणार होता. मात्र, पाटील याने शब्द पाळला नाही. उलट त्याने कर्नाटकी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली.

प्रभाकर कर्नाटकी हे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तणावाखाली होते. मी आत्महत्या करणार आहे, जाताना रवी पाटीलसह सर्वांनाच कामाला लावतो, असे म्हणत होता.

मात्र त्याच्या बोलण्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. तर काहींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करुनही उपयोग झाला नाही.

त्यामुळे कर्नाटकी यांनी नगरपालिकेच्या बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्नाटकी यांची मुलगी शिवानी प्रभाकर कर्नाटकी हिच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाटील याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रभाकर कर्नाटकी याने स्वत:चा एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात रवी पाटीलकडून मला कसा त्रास झाला याचे कथन केले आहे.

तसेच रवी पाटील याने शहरातील काही नेेत्यांच्या नावाचा उल्लेख करुन ते माझे काहीही करु शकत नाही, असे म्हणून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे कर्नाटकी यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment