Insurance Policy:- विमा एक खूप महत्त्वाची संकल्पना असून याचे आरोग्य, लाईफ आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स असे प्रकार पडतात. तुम्हाला याकरिता वेगवेगळ्या प्रकारची पॉलिसी अर्थात विमा प्लान घ्यावा लागतो. परंतु आता लवकरच तुम्हाला हे तीनही प्रकारचे फायदे एकाच प्रकारच्या पॉलिसीमध्ये मिळवता येणार आहेत.
या पॉलिसीला विमा विस्तार असे नाव देण्यात येणार आहे. ही सिंगल पॉलिसी असणार असून यामध्ये जीवन,आरोग्य, मालमत्ता आणि वैयक्तिक अपघात कवच उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच पॉलिसीमध्ये विमा संरक्षणाचा लाभ देखील मिळणार आहे.
यामध्ये विमा नियामक अर्थात आयआरडीआयने अलीकडेच हैदराबाद मधील विमा कंपन्यांशी या पॉलिसीवर चर्चा केली असून प्रत्येक पॉलिसीचा प्रीमियम हा पंधराशे रुपये निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. या विमा विस्तार पॉलिसीचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागासह देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला विमा उपलब्ध करून देणे हा आहे.
एकच पॉलिसीमध्ये मिळतील तीन प्रकारचे विमा कव्हर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हैदराबाद मध्ये आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली व या बैठकीत विमा विस्तार या योजनेचा तपशील मांडण्यात आला. याबद्दल माहिती देताना संबंधित सूत्रांनी सांगितले की, जीवन, मालमत्ता आणि वैयक्तिक अपघातांच्या बाबतीत प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण यामध्ये मिळू शकणार आहे व एवढेच नाही तर हॉस्पिटल कॅश या नावाने आरोग्य कवच देखील मिळणार आहे.
विशेष म्हणजे या हॉस्पिटल कॅश आरोग्य कवचमध्ये कुठलेही कागदपत्रे सादर न करता दहा दिवसांपर्यंत कमाल पाच हजार रुपयांपर्यंतच्या बिलांच्या कॅशलेस पेमेंटचा दावा केला जाऊ शकतो.
तसेच जर आपण प्रीमियम बघितले तर लाइफ कव्हरसाठी 800 रुपये असण्याची शक्यता आहे व हेल्थ कव्हर 500 रुपये आणि वैयक्तिक अपघात कवर 100 रुपयांच्या प्रीमियममध्ये उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे या अंतर्गत प्रॉपर्टी कव्हर करिता शंभर रुपयांपेक्षा कमी प्रीमियम असेल अशी एक शक्यता आहे.
या पॉलिसीत वेगवेगळ्या विम्याकरिता क्लेम सेटलमेंट वेगवेगळे असेल
या विमा विस्तार पॉलिसी मधील वेगवेगळ्या विभागांकरिता क्लेम सेटलमेंटची पद्धत वेगळी असू शकते. ज्याचा निर्णय विमा कंपन्या घेतील. जे विमा एजंट ही पॉलिसी विकतील त्यांना दहा टक्के कमिशन दिले जाऊ शकते. विमा सुगम, विमा विस्तार आणि विमा वाहक या स्वरूपात विमा ट्रीनिटी सादर करण्यासाठी आयआरडीए बऱ्याच काळापासून तयारी करत आहे.
बीमा सुगम या डिजिटल प्लॅटफॉर्मला आयआरडीएआयने मागच्या महिन्यात मान्यता दिली होती व हे सर्व प्रकारच्या विमा पॉलिसींचे दावे खरेदी, विक्री आणि निकाली काढण्यासाठी ऑनलाईन इन्शुरन्स मार्केट प्लेस प्रमाणे काम करेल. यामध्ये कोणतेही शुल्क न भरता विमाधारक त्यांच्या सर्व पॉलिसीचे तपशील त्यावर तपासू शकतील.