स्थापत्य अभियंता लाचेच्या जाळ्यात

Published on -

पाथर्डी  – जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी पाथर्डी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता पंढरीनाथ उत्तम आव्हाड यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती.

त्याची तक्रार केल्यानंतर आव्हाड यांना लाचलुचपत पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नवीन बसस्थानका शेजारील चहाच्या दुकानात सायंकाळी आव्हाड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्‍यातील जांभळी येथे झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या खोलीकरण व दुरुस्ती कामाचे बिल काढण्यासाठी स्थापत्य अभियंता आव्हाड यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीत चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने सापळा लावला.

आव्हाड यांनी नवीन बसस्थानका शेजारी चहाच्या हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारली.लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याबाबत कारवाई सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News