अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- टाकळीभान ग्रामपंचायतीने सहा महिन्यापूर्वी दलीत वस्तीसाठी तयार केलेला रस्ता पावसामुळे चिखलात हरवला आहे. कागदावर एक काम व प्रत्यक्षात दुसर्या ठिकाणी रस्ता झाला आहे.
कांबळे वस्तीसाठीचा मंजूर निधी दुसर्याच ठिकाणी वापरला गेल्याने ऐन पावसाळ्यात या दलित वस्तीतील नागरिकांना चिखल तुडवित रस्ता शोधावा लागत आहे.
या रस्त्याची अवस्था दयनिय झाली असल्याने चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी केली जावी,
अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी निवेदनाद्वारे केली आहे. शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान येथील प्रभाग क्रमांक 5 मधील दलित वस्ती असलेल्या कांबळे वस्तीसाठी अनु.जाती,
जमाती- नवबौध्दघटकांचा विकास करणे या 2018-2019 च्या जि.प.अहमदनगर या योजनेखाली सिमेंट रस्त्यांसाठी 4 लक्ष 42 हजार 133 रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
मंजूर निधी या परिसरातील दलितांच्या विकासासाठी या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी वापरणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात हा निधी मंजूर रस्त्यासाठी न वापरता याच प्रभागातील राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी
लक्ष्मीवाडी परीसरात काही प्रमाणात वापरला गेला आहे. येथेही दलित वस्तीचा संपूर्ण मंजूर निधी न वापरता केवळ सुमारे 150 फूट अंतराचा सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे.
वास्तविक हा 150 फुटांचा सिमेंटचा केलेला रस्ता लक्ष्मीवाडी परीसरातील असल्याने कांबळे वस्ती रस्त्याचा मंजूर निधी या परीसरात राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी खर्च करून ग्रामपंचायत प्रशासनाने बनवाबनवी केली असल्याचा
आरोप शिंदे यांनी केला आहे. याची चौकशी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत व्हावी, अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी निवेदनाद्वारे केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved