‘ह्या’ आमदारांची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

जामखेड आणि कर्जत तालुक्यात तसेच राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही जोरदार पाऊस पडला. परंतु पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत.

यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कपाशी, बाजरी, तूर, फळबागा, जनावरांच्या चार्‍याचे व इतर उसासह सर्वच पिके जमिनीवर पडले असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे. याबाबत आमदार राजळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी,जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी,

तहसीलदार पाथर्डी व शेवगाव तसेच तालुका कृषी अधिकारी पाथर्डी व शेवगाव, यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेवगाव तालुक्यातील प्रामुख्याने वडूले खुर्द, वाघोली, ढोरजळगाव-शे ढोरजळगाव-ने, गरडवाडी, आव्हाणे, सामणगाव, आपेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, निंबेनांदूर, मळेगाव, मलकापूर व परिसरातील गावांचा समावेश आहे.

पाथर्डी तालुक्यामध्ये चितळी, पाडळी, जवखेडे खालसा, जवखेडेदुमाला, कासारपिंपळगांव, हनुमानटाकळी, हत्राळ, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे, कोपरे, प्रभुपिंप्री, कोरडगाव, वसुजळगाव, आडगाव, कामत शिंगवे, रेणुकाईवाडी व इतर गावांचा समावेश आहे.

या गावातील नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनास आदेश देण्यात येऊन सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. राजळे यांनी निवेदनात केली आहे.

दरम्यान जिल्हाभरात, ठिकठिकाणी झालेली अतिपावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे.

या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत.

प्रशासनाने या सर्वांची पाहणी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment