अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- पावसाचे पाणी पिकात जाऊ लागल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र एवढे करूनही काहीच मार्ग निघेना अखेर त्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यात घडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले यामुळे रस्त्याचे रूपांतर बंधाऱ्यात झाले.
पावसाळ्यात दर वर्षी रुई येथील सर्जेराव वाबळे, कचरू वाबळे, संदीप गमे, दीपक वाबळे, रावसाहेब देशमुख, नारायण मते, चंद्रकांत कुदळे आदींसह 13 शेतकऱ्यांच्या शंभर एकरांत तळे साठते.
रस्त्याच्या पलीकडे ओढा आहे. तो या रस्त्याने अडला. पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. दर वर्षी पावसाळ्यात शेतात पाणी साठून पिके सडू लागली.
अधिकाऱ्यांना अर्ज-विनंत्या केल्या पण काही उपयोग झाला नाही, अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब देशमुख यांनी चक्क तुडुंब भरलेल्या विहिरीत
अधिकाऱ्यांसमोर उडी घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. विहिरीत पोहतच देशमुख यांनी अधिकाऱ्यांसोबत बोलणी सुरू केली.
चोवीस तासांत प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर देशमुख यांनी पोहणे थांबविले व या नाट्यावर पडदा पडला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved