पावसाळा म्हटलं म्हणजे एक आल्हाददायक ऋतू आणि सगळीकडे हिरवाईने नटलेली अवघी धरणी, रिमझिम पडणारा पाऊस आणि त्या पावसामध्ये कारने किंवा आपल्या बाईकने मस्तपैकी फिरायला जाणे म्हणजे एक नवलाई आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या दृष्टिकोनातून हा कालावधी खूप महत्त्वाचा असतो.
पावसाळ्यामध्ये निसर्ग किंवा अवघी धरणी माता नटायला निघते व तिच्या सुंदरतेचे दर्शन दैनंदिन आयुष्यात ताणतणावात जीवन जगत असलेल्या पर्यटकांना घडवते व त्यांना देखील खऱ्या जीवनाचा आनंद देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभवते. या पावसाळ्यामध्ये बरेच जण पर्यटनासाठी बाहेर निघतात व निसर्गरम्य ठिकाणी काही क्षण घालवून तेच तेच जीवन जगण्याच्या दररोजच्या रुटीन पासून काहीसा मनाला सुखद अनुभव आणि आनंद देतात.
यामध्ये काहीजण नुसते निसर्गाचा आनंद घेता तर काही जणांना गडकिल्ल्यांची सैर तसेच साहसी पर्यटन आणि ट्रेकिंगचा अनुभव देखील घ्यायचा असतो व अशी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आहेत. अशी अनेक गड किल्ले तसेच सुंदर डोंगर दऱ्या आपल्याला पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी आपले मन हरकून जाते.
याच पद्धतीने तुम्हाला देखील या पावसाळ्यामध्ये एखाद्या गड किल्ल्याची सैर करायची असेल व त्या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर या लेखामध्ये काही स्थळे दिली आहेत त्यांची माहिती थोडक्यात बघू.
सहासी पर्यटन आणि ट्रेकिंग करिता महत्त्वाचे आहेत हे ठिकाण
1- कळसुबाई शिखर– कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर म्हणून ओळखले जाते हे आपल्याला माहिती आहे. समुद्रसपाटीपासून कळसुबाई शिखराची उंची तब्बल 5400 फूट आहे व मीटर मध्ये पाहिली तर ती 1646 मीटर इतकी आहे. तुम्हाला जर साहसी पर्यटन आणि ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही कळसुबाई शिखराला भेट देऊ शकतात व या पावसाळ्यात त्या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
2- सांधन व्हॅली– नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका म्हटला म्हणजे निसर्गाने दिलेली एक मोठी देणगीच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पावसाळ्यामध्ये इगतपुरीचा परिसर हा इतका सुंदरतेने नटलेला असतो की त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करतात.
याच इगतपुरी मध्ये सांधन व्हॅली असून या ठिकाणी ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर आनंद घेता येईल असे हे ठिकाण आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 200 फुट खोल दरी आहे व त्यामुळे ट्रेकर येथे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.
3- रतनगड किल्ला– अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात हे ठिकाण असून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रतनगड किल्ला हे उत्कृष्ट ठिकाण आहे. रतनगड किल्ल्याची उंची पहिली तर ती समुद्रसपाटीपासून तब्बल 3523 फूट असून रतनगड किल्ल्याला तुम्हाला जायचे असेल तर गडाच्या पायथ्याशी रतनवाडी हे गाव आहे
व त्या ठिकाणी अगोदर तुम्हाला जायला लागते. या रतनवाडीला तुम्ही संगमनेरहुन देखील जाऊ शकता व संगमनेर मार्गे जाल तर तुम्हाला अकोले, राजूर लागेल व पुढे भंडारदरा हे एक निसर्गरम्य ठिकाण पाहून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात.
4- हरिहर किल्ला– हरिहर किल्ला हे देखील एक ट्रेकिंगसाठी महत्त्वाचे व ट्रेकिंगचे आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी साहसी पर्यटनाचे एक ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ असून हरिहर किल्ल्याला भेट देऊन तुम्ही ट्रेकिंगचा खूप मनमुराद आनंद घेऊ शकतात.
5- लोहगड किल्ला– लोणावळा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पूर्ण वर्षभर पर्यटकांची गर्दी असते व देश विदेशातून या ठिकाणी लाखोंच्या संख्येत पर्यटक हजेरी लावत असतात. तुम्ही जर लोणावळ्याला गेलात आणि तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही लोणावळ्या जवळील लोहगड किल्ल्याला भेट देऊ शकतात. आपण लोहगड किल्ल्याची उंची पाहिली तर ती 3420 फूट इतकी आहे व ट्रेकिंग करिता ट्रेकर्स कडून या किल्ल्याला पसंती दिली जाते.
6- तुंग किल्ला– साधारणपणे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या किल्ल्याचे नाव अजून पर्यंत ऐकलेले नसेल. या किल्ल्याचा इतिहास पाहिला तर 11 जून 1665 रोजी जो काही पुरंदरचा तह झाला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी जयसिंगाला 23 किल्ले दिले होते व त्या किल्ल्यांमध्ये तुंग हा एक किल्ला होता. या किल्ल्याची उंची 3000 फूट इतकी असून पर्यटन आणि निसर्गाचा आनंद व ट्रेकिंग करिता हा एक उत्कृष्ट किल्ला आहे.
7- नाणेघाट– नाणेघाट हा निसर्गरम्य परिसर असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रवाहीत होणारी धबधबे आणि त्या ठिकाणची हिरवाई पर्यटकांचे खास आकर्षणाचे केंद्र ठरते. नाणेघाट हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील घाट असून हा घाट ट्रेकर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे व या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठी गर्दी होते.