कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्या काही कल्पना किंवा तुमच्या छोट्या छोट्या आयडिया देखील तुम्हाला खूप मोठे यश मिळवून देतात व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देखील आपल्याला मिळायला लागते. त्यामुळे फक्त डोक्याचा वापर करून काही गोष्टी या पद्धतीने करणे खूप गरजेचे असते.
शेती क्षेत्रामध्ये जर आपण बघितले तर शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांकडे दहा ते वीस एकर पर्यंत क्षेत्र असते. परंतु तरी देखील त्यांना हवे तेवढे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न मिळवता येत नाही. परंतु काही शेतकरी तंत्रज्ञानाचा आणि कल्पनेचा योग्य वापर करत अगदी एक दोन एकरमध्ये सुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये यशस्वी होतात.
त्यामुळे तुमच्याकडे क्षेत्र किती आहे याला महत्व नसून आहे त्या क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने शेती करतात या गोष्टीला खूप महत्त्व आहे.
याच मुद्द्याला धरून जर आपण पुण्यातील भोर तालुक्यातील वेळू या गावचे गुलाब घुले यांचे उदाहरण घेतले तर यांनी त्यांच्या शेतामध्ये फक्त सहा वेली विड्याच्या पानांची लागवड केलेली आहे व त्या माध्यमातून ते महिन्याला दहा हजार पेक्षा जास्त उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे त्यांनी हे कसे शक्य केले याचीच थोडक्यात माहिती आपण लेखात घेणार आहोत.
सहा विड्याच्या पानांच्या वेलीपासून महिन्याला घेतात दहा हजाराचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या वेळू या गावचे गुलाब घुले हे अनेक वर्षापासून प्रयोगशील पद्धतीने शेती करतात. त्यांच्या शेतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेतीमध्ये उत्पादन घेताना कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता संपूर्ण विषमुक्त शेती करण्यावर त्यांचा भर आहे.
गुलाब घुले हे पुणे येथे पीएमटी मध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीला होते व त्यांनी काही वर्षांपूर्वी या नोकरीतून स्वच्छ निवृत्ती घेतली आणि शेती करायला सुरुवात केली. परंतु जेव्हा त्यांनी शेती करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी ठरवले तर संपूर्णपणे विषमुक्त पद्धतीची शेती करावी.
शेती करायला सुरुवात करत असताना त्यांनी विविध फळझाडांची लागवड केली व त्यामाध्यमातून घेतलेले उत्पादन देखील पूर्णपणे विषमुक्त पद्धतीने घेतले व त्या फळांची विक्री थेट ग्राहकांना त्यांनी केली.
या सगळ्या प्रयोगांचा भाग म्हणून त्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ सहा वेली विड्याच्या पानांची लागवड केली होती व त्या माध्यमातून असताना महिन्याला चांगला पैसा मिळत आहे.
अशा पद्धतीने केली त्यांनी विड्याच्या पानांची लागवड
जेव्हा त्यांनी विड्याच्या पानांची लागवड करण्याचे ठरवलं तेव्हा शेतात असलेल्या नारळाच्या झाडाच्या मुळाजवळ एक फुटाच्या विडाच्या पानाची कांडीची लागवड केली.
साधारणपणे याकरिता हलकी किंवा चुनखडीची साधी जमिनीची गरज असते. लागवड करताना त्यांनी एक खड्डा खोदला व त्यामध्ये शेणखत तसेच पालापाचोळा व जीवामृत टाकून लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधीत ही वेल पाच फुटापर्यंत वाढली.
या सहा वेलींचे व्यवस्थापन देखील त्यांनी योग्य पद्धतीने केले व या वेलींना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जीवामृत दिले व आजही देतात.
या वेली चांगल्या वाढाव्या म्हणून थेट नारळाच्या खोडांचा वापर केला व या वेलींवर जीवामृत तसेच निंबोळी व तंबाखू अर्क यांची फवारणी केली. या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर केला नाही.
कशा पद्धतीने करतात ते विक्री व्यवस्थापन?
त्यांच्या शेतामध्ये जे ही उत्पादन पिकवले जाते ते संपूर्ण विषमुक्त असते. त्यामुळे अनेक ग्राहक आणि शेतकरी त्यांच्या शेतात भेट द्यायला येतात व विड्यांच्या पानांची देखील बांधावरूनच विक्री केली जाते. शेतात लागवड केलेल्या इतर भाजीपाल्यासोबत ते विड्याच्या पानांची विक्री आठवडे बाजारामध्ये करतात.
त्यांच्या या पानांना इतर पानांपेक्षा दुप्पट दर मिळतो. कारण त्यांनी या करिता कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न केल्याने ते विषमुक्त असल्याने हा दर मिळतो. साधारणपणे सात ते आठ महिन्यानंतर यावेळी पासून पाने मिळायला सुरुवात होते व सहा वेलीपासून ते महिन्याला चार ते साडेचार हजार पानांची थेट विक्री करतात व १००० पाने हे ग्राहक थेट शेतात येऊन विकत घेतात.
म्हणजेच महिन्याला पाच हजार पानांची विक्री ते करतात व एक पान दोन रुपये याप्रमाणे विक्री होत असल्यामुळे दहा हजारांचे महिन्याकाठी त्यांना उत्पन्न मिळते. म्हणजेच कुठलीही जागा व कुठलाही खर्च न करता हे उत्पन्न ते मिळवत आहे.
त्यांच्या शेतातील विड्याची पाने अमेरिकेपर्यंत देखील पोहोचली
आपल्याला माहित आहे की विड्याच्या पानांपासून मुखवासासारखे पदार्थ तयार केले जातात. विषमुक्त पद्धतीने जर विड्याची पाने उत्पादित केलेली असतील तर अशा पानांपासून तयार केलेले पदार्थ जास्त कालावधी करिता टिकतात व प्रक्रिया करण्यासाठी देखील अशा पानांना खूप मागणी असते.
त्यामुळे पुण्यातील अनेक ग्राहक या पानांपासून तयार केलेल्या मुखवास विदेशात असलेल्या मुलांना पाठवतात. अशाप्रकारे गुलाब यांनी सांगितले की, ग्राहकांनी अमेरिकेतील त्यांच्या मुलांना आमच्या पानांपासून बनवलेला मुखवास पाठवला आहे व अशा पद्धतीने आमच्या शेतातील विड्याची पाने अमेरिकेपर्यंत देखील पोहोचली.