Farmer Success Story:- आयुष्यामध्ये एखाद्या छोट्या गोष्टीची सुरुवात करणे व या छोट्या गोष्टीतून केलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगणे व त्यासाठी अखंड मेहनत घेणे गरजेचे असते. व्यक्तीचे अनेक प्रकारचे स्वप्न असतात व या स्वप्नपूर्तीसाठी व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते.
स्वप्नपूर्तीच्या मार्गामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर खाचखळगे येतात किंवा परिस्थिती अशी निर्माण होते की आता सर्व काही संपले असे वाटायला लागते. परंतु अशा अवघड परिस्थितीमध्ये देखील परिस्थितीशी दोन हात करत मार्ग काढून यशापर्यंतचा खडतर मार्ग अनेकजण पूर्ण करतात व आपले स्वप्न पूर्ण करून यशस्वी जीवन जगतात.
याच मुद्द्याला धरून जर आपण गरिबीतून जीवन जगत असताना समृद्धीचा मार्ग धरलेले रमेश रूपारेलिया या गुजरात राज्यातील छोट्या गावातील शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर ती इतर शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रेरणा देणारी आहे. आयुष्यामध्ये 80 रुपये कमवत असलेला हा शेतकरी आता वर्षाला आठ कोटी रुपये कमवत आहे. परंतु या मार्गावर पोहोचण्यासाठी त्यांना अत्यंत कष्ट करावे लागले.
रमेश रूपारेलिया यांची यशोगाथा
गुजरात राज्यातील एका छोट्याशा गावात राहणारे रमेश भाईंना अगदी लहानपणापासून अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला व यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून असलेली संकट खूप मोठे होते. घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असल्यामुळे जेमतेम त्यांना सातवीपर्यंत शिक्षण घेता आले.
परंतु रमेश यांच्यामध्ये एक गुण असा होता की त्यांना अगदी लहानपणापासून गाई खूप आवडायच्या व संगीताची आवड देखील त्यांना होती. जीवनात येणाऱ्या असंख्य समस्यांची लढा देत असताना त्यांनी 2010 मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु शेती करायची म्हणजे स्वतःकडे जमीन असणे गरजेचे आहे व त्यांच्याकडे स्वतःची जमीन देखील नव्हती.
तरी देखील त्यांनी हार न मानता एका जैन कुटुंबाकडून जमीन भाड्याने घेतली व शेती करायला सुरुवात केली. शेती करताना मात्र त्यांनी त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करायचा नाही व फक्त गाईचे शेणखताचा वापर करायचा असा निश्चय केला व यातच त्यांचा खूप मोठा फायदा झाला.
कशा पद्धतीने वळले गाय पालनाकडे?
शेती करत असताना शेतीमधून जो काही पैसा त्यांनी कमावला त्यामध्ये त्यांनी चार एकर जमीन घेतली आणि गाई पालन व्यवसायाला सुरुवात केली. शेतीमध्ये त्यांनी वैदिक पद्धतीचे गाय पालन आणि गाईंवर आधारित शेतीचा वापर केला. आता ते ‘श्री गीर गौ कृषी जतन संस्था’ नावाने एक स्वतःचा गाईंचा गोठा चालवतात व यामध्ये गिर गाईंचे पालन करतात.
या गीर गाईच्या दुधापासून बनवलेले सेंद्रिय तुपाची विक्री करून ते करोडो रुपये या माध्यमातून कमवत आहेत. आज त्यांच्या गोठ्यामध्ये साधारणपणे 250 पेक्षा अधिक गीर गाई असून यांच्या माध्यमातून उत्पादित होणारे दूध तसेच ताक, लोणी व तुपाची विक्री ते करतात व या सगळ्या दुग्धजन्य पदार्थांना खूप मोठी मागणी देखील आहे.
अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये कष्टाने सुरू केलेल्या त्यांचा हा व्यवसाय आज भारतामध्येच नाही तर या जगातील 123 देशांमध्ये पसरलेला आहे.
या गीर गाईच्या दुधापासून ते जे काही दुग्धजन्य उत्पादने तयार करतात त्यांच्या गुणवत्तेवर त्यांनी विशेष लक्ष दिले असून त्यांचे उत्पादने आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नावारूपाला येत आहेत. या सगळ्या व्यवसायातून त्यांनी वर्षाला सुमारे आठ कोटी रुपयांची कमाई करण्यापर्यंत मजल मारलेली आहे.