आज प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा १८ वा पदवी प्रदान समारंभ

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा १८ वा पदवी प्रदान समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांनी दिली.

गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. गुजरातचे उद्योजक आणि समाजसेवक पद्मश्री पुरस्कार सन्मानित सावजी ढोलकीया यांना त्यांच्या सामाजीक आणि पाणी संवर्धनाच्या अतुलनिय कार्यासाठी मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

या शिवाय कार्यक्रमात एकुण ९४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यात मेडीकल सायन्सचे ३३५, डेन्टल शाखेचे १२५, फिजोओथेरपी १३२, नर्सीग २३७, पब्लिक हेल्थ सायन्स ११२ आणि पीएचडीचे ९ असे पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने स्थापने पासुनच ग्रामीण भागातील नागरीकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू समजून आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. स्व. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दृष्टीकोनातून सुरु झालेला हा विद्यापीठाचा प्रवास आज राज्यातील एक आदर्शवत विद्यापीठ असा होतो आहे.

दरवर्षी १० लाख पेक्षा जास्त नागरीकांना अल्प खर्चात आरोग्य सेवा देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे डॉ. व्ही. एन. मगरे यांनी सांगितले.

या समारंभास प्रवरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव अरुण कुमार व्यास यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe