अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- विहिरीतील खोल पाण्यात पडलेल्या साडेतीन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला बाहेर काढण्यात एक तासाच्या प्रयत्नांनंतर यश आले. उपस्थित शेतकऱ्यांनी वनविभाग कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
शेळीची शिकार करून चाललेली बिबट्याची मादी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सात्रळ येथील कैलास जगन्नाथ प्रधान यांच्या विहिरीत पडली होती. तिच्या डरकाळ्या एेकून परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली.
विहिरीतील पाइपला धरून मादी जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवले.
राहुरीचे वनपाल सचिन गायकवाड, समाधान चव्हाण, मुरलीधर हारदे, शंकर खेमनर, मुसा पठाण सकाळी ८ वाजता घटनास्थळी पोहोचले.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांनी मादीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दोरखंडाला बांधून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला.
तासाभराच्या प्रयत्नांनंतर बिबट्याच्या मादीने पिंजऱ्यात प्रवेश करताच उपस्थित शेतकरी व वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
या मादीला म्हैसगाव येथील रोपवाटिकेत नेण्यात आले आहे. पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तिला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठांच्या आदेशानंतर बिबट्याच्या मादीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved