सावेडी हे नगर शहराचे सर्वाधिक विस्तारित झालेले उपनगर आहे. एक लाखांहून अधिक नागरिक या भागात राहतात. प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महल हा या भागातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. अवघ्या दीड – दोन वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी सुमारे रू. ४ कोटी खर्च करून हा मॉडेल रस्ता म्हणून विकसित केला जात असल्याचा दावा करत रस्ता केला गेला होता. मात्र जनतेच्या पैशांवर डल्ला मारला गेला असून तथाकथीत मॉडेल रस्ता गायब झाला असून यावर निकृष्ट कामामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याचा आरोप करत समाज माध्यमांवर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाईव्ह पोलखोल केली आहे. यावेळी त्यांनी मनपा प्रशासन, सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
शहराच्या विद्यमान लोकप्रतिनिधींकडून ‘विश्वास जुना, आम्हीच पुन्हा’ असे म्हणत शहरभर पोस्टरबाजी करत सुरू असणाऱ्या जुन्या विश्वासाच्या दाव्याची शहर काँग्रेसकडून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पोलखोल करणारा सप्ताह महात्मा गांधी जयंती निमित्त राबविला जात आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरत या मॉडेल रस्त्याची चांगलीच पोलखोल केली. ‘सदैव प्राधान्य विकास कामांना, विश्वास जुना, आम्हीच पुन्हा’ असे मोठे होर्डिंग सत्ताधाऱ्यांनी प्रोफेसर चौकात लावले आहे. या होर्डिंग खालीच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांची काळेंनी लाईव्ह पोलखोल केली. आत्तापर्यंत सोशल मीडियावर हजारो नेटकेऱ्यांनी ही पोलखोल पाहिली असून त्यावर आता सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. यामध्ये काँग्रेसचे काळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आ. संग्राम जगताप यांचे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहेत.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी. रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल ‘विश्वास जुना, अनुभव जुना… रस्त्यांच्या कामात खाऊ पैसे पुन्हा पुन्हा’ असे फलक झळकवण्यात आले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. नागरिकांनी देखील रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल रोष व्यक्त करण्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या व्हिडिओत काळे यांच्याशी शहरातील नागरिक बोलताना दिसत असून एका नागरिकाने यावेळी बोलताना म्हटले की, एवढे फ्लेक्स लावून वायफळ खर्च करण्याऐवजी या रस्त्याचं चांगलं पॅचींग करायला पाहिजे होतं अस म्हणत आपली नाराजी व्यक्त केल्याचे व्हिडिओ दिसत आहे.
काळे यावेळी बोलताना म्हणाले, नगरोत्थान योजनेच्या व्याजाच्या पैशातून रुपये ३.८४ कोटी खर्च करून ए. जी. वाबळे या कंत्राटदाराला या कामाचा ठेका दिला होता. रस्त्याच्या कामाला तीन वर्षांमध्ये काही होणार नाही याची हमी दिली गेली होती. मात्र प्रत्यक्षात अवघ्या दीड वर्षातच रस्ता पावसात वाहून गेला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून रोज या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असते. नागरिकांच्या पाठीची हाडे खिळखिळी झाली असून प्रचंड मनस्तापाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
पैसे खाल्ल्याचा केला आरोप :
काळे म्हणाले, जेव्हा प्रत्यक्ष या रस्त्याचे काम सुरू होते त्यावेळी देखील काँग्रेसने कामाच्या दर्जाबाबत मनपाकडे आक्षेप घेतला होता. त्यावेळी शहर लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्याने हे काम दर्जेदाररित्या सुरू आहे, तुम्ही इथे यायचे नाही असे म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली होती. मात्र आता हे नगरकरांच्या समोर स्पष्ट झाले आहे की संबंधित ठेकेदार, मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे यात संगनमत असून सगळ्यांनी या तथाकथीत मॉडेल रस्त्याच्या कामात पैसे खाऊन भ्रष्टाचार केला आहे. या रस्त्याचे संपूर्ण बिल अदा करण्यात आले असून सगळ्यांनी ताव मारला आहे. त्यामुळे सावेडीकर माञ खड्ड्यात गेले आहेत. हा केवळ प्रतिनिधिक स्वरूपात पोलखोल केलेला रस्ता असून शहरातील प्रत्येक रस्त्याची हीच दुरावस्था असल्याचा गंभीर आरोप काळे यांनी केला आहे.
सोशल फाउंडेशन कडून डागडूचीचा दिखावा :
शहराच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची अनेक वेळा पाहणी करून त्यांच्या संकल्पनेतून पाठपुराव्यातून आणि देखरेखीखाली हा मॉडेल रस्ता केला जात असल्याची माहिती त्यांनी स्वतःच नगरकरांना दिली होती. त्यावेळी फोटोसेशन देखील करण्यात आले होते. मात्र भ्रष्टाचारामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील आठवड्यात तथाकथित कार्यसम्राटांच्या नावे असणाऱ्या सोशल फाउंडेशनच्या वतीने या रस्त्यावर डागडुजी केली जात असल्याचा दिखावा केला होता. मात्र एका पावसातच ती डागडूजी वाहून गेली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
पथदिवे बंद, पेव्हिग ब्लॉक गायब :
मॉडेल रस्त्याच्या कामामध्ये संपुर्ण रस्त्यावर मध्यभागी दुभाजक टाकने याची तरतूद केल्याचे म्हटले होते. मात्र प्रोफेसर चौक वगळता या रस्त्यावर कुठेही दुभाजक दिसत नाहीत. रस्त्याच्या बाजूला पाईप गटारीचे काम केल्याचे मनपा म्हणते. मात्र त्याचे देखील काम अर्धवट आणि निकृष्ट केले गेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाटसरुंसाठी पेव्हींग ब्लॉक टाकले जाणार होते. तेही कुठे दिसत नाहीत नसल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.
जनताच धडा शिकवेल:
मनपाकडे तक्रार करून काही उपयोग नाही. सर्वांचीच मीलीभगत असून त्याला राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे आता जनतेच्या दरबारातच ही पोलखोल काँग्रेस करत राहील. येऊ घातलेल्या विधानसभा, मनपा सार्वत्रिक निवडणुकीत जनताच रस्त्याच्या कामात मलिदा खाणाऱ्यांना धडा शिकवील्या शिवाय राहणार नाही असे काळे यांनी म्हटले आहे.
तत्कालीन आयुक्तांनी मलिदा लाटला :
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या मनपाच्या तत्कालीन आयुक्तांनी या मॉडेल रस्त्याच्या दुरुस्तीचा रू. ५० लाखांचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करा , कारवाई करा असे आदेश दिले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी अंधारात सेटलमेंट केली काय ? कारण आज पर्यंत राजकीय दबावातून कोणतीच कारवाई प्रत्यक्षात झाली नाही. विशेष म्हणजे या आयुक्तांना नगर शहरामध्ये आणण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे त्यांच्यावर कौतुकांची स्तुतिसुमने उधळत लेखी शिफारस केली होती. हे सर्वश्रेत असल्याचे काळे मी म्हटले आहे. दरम्यान, मनपाने ठेकेदाराला काही महिन्यांपूर्वी डागडुजी करण्याची नोटीस काढली होती. अन्यथा डिपॉझिट जप्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याला ठेकेदाराने केराची टोपी दाखविली आहे. काळेंनी आरोप केला आहे की, ही सर्व नौटंकी सुरू असून संगनमताने सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे पाप केले जात आहे.
अत्यंत वर्दळीचा रस्ता :
या रस्त्यावर तोफखाना पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, आधार केंद्र, सेतू केंद्र, पोस्ट ऑफिस, मनपाचे प्रभाग कार्यालय तसेच अत्यंत वर्दळीची प्रोफेसर चौकातील चौपाटी, हजारो विद्यार्थी ये-जा करत असणारी समर्थ विद्यामंदिर प्रशाला, कृष्ठधामचे आरोग्य आधार केंद्र, दवाखाने, मेडिकल, व्यावसायिक आस्थापना यासह मोठी नागरी वसाहत असून सावेळी उपनगरातील नागरिकांसाठी हा रस्ता म्हणजे मुख्य शहराशी जोडली जाणारी लाईफ लाईन आहे. मॉडेल रोड मधील निकृष्ट काम आणि भ्रष्टाचारामुळे उपनगरातील लाखो लोक मात्र त्रस्त झाले असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
या पोलखोल मोहिमेत मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, माजी नगरसेवक फैयाज केबलवाला, युवक काँग्रेसचे शम्स खान, चंद्रकांत उजागरे, आर.आर.पाटील, राहुल सावंत, ॲड. अजित वाडेकर, मुस्तफा खान, महिला काँग्रेसच्या उषा भगत, शैला लांडे, डॉ. जाहिदा शेख, मीनाज सय्यद, शंकर आव्हाड, सुफियान रंगरेज, गौरव घोरपडे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, आनंद जवंजाळ, अशोक जावळे वाढदिवसाच्या काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.