Lemon Crop Cultivation:- फळबागेमध्ये जर बघितले तर लिंबू लागवड ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे पिक म्हणून ओळखली जाते व आता मोठ्या प्रमाणावर लिंबू लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातच नाही तर भारतातील इतर राज्यांमध्ये आता लिंबू लागवडीखालील क्षेत्रात हळूहळू वाढ होत असून कमी खर्चात जास्त उत्पादन क्षमता असल्यामुळे लिंबू शेती शेतकऱ्यांना नक्कीच परवडणारी आहे.
अगदी या अनुषंगाने आपण राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी अभिषेक जैन यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणादायक आहे. अभिषेक जैन यांना लेमन किंग या नावाने ओळखले जाते.

अभिषेक जैन यांच्याकडे 29 एकर शेती आहे व त्यातील आठ एकर वर त्यांनी लिंबू लागवड केलेली आहे व त्यातून ते वर्षाला 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवतात.
कसे आहे अभिषेक जैन यांच्या लिंबू शेतीतील खर्च आणि नफ्याचे गणित?
लिंबू शेतीमध्ये लागणारा खर्च आणि एकंदरीत नफ्याचे गणित याविषयी माहिती देताना अभिषेक जैन यांनी म्हटले की, लिंबू शेती हा एक फायदेशीर पर्याय असून अगदी लहान शेतकरी देखील या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. त्यांच्या मते 18 बाय 18 फूट अंतरावर लिंबू लागवड केली तर एका एकरमध्ये 144 झाडे लावता येतात.
एका रोपापासून सरासरी 100 किलो लिंबूचे वार्षिक उत्पादन होते. या प्रकारे 140 क्विंटल म्हणजे 14 टन लिंबू एका एकर मधून मिळतो. जर आपण लिंबूचा बाजारभाव पाहिला तर तो हंगाम आणि मागणीनुसार 15 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत असतो. त्यामुळे शेतकरी वर्षभर या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
जर आपण लिंबू शेतीमधील खर्च पाहिला तर तो मजुरी, खत व्यवस्थापन तसेच सिंचन व इतर आवश्यक गरजा मिळून एकरी 30 ते 35 हजार रुपये इतका येतो. लिंबूला जास्त मागणी आणि वाढत्या किमतीमुळे हे पिक शेतकऱ्यांना दरवर्षी चांगला नफा देऊ शकते असे त्यांनी म्हटले सांगितले.
अभिषेक जैन यांनी लिंबू पिकासाठी खूप मेहनत घेतली असून लिंबू शेतीमधील अनेक बारीक सारीक गोष्टींकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष पुरवले आहे व त्या पद्धतीने वनस्पतींची काळजी घेतली आहे.
योग्य प्रमाणे खत व्यवस्थापन तसेच सिंचनाची व्यवस्था आणि छाटणीच्या योग्य पद्धती व कालावधी याचा अवलंब केल्यामुळे अभिषेक जैन यांना भरघोस उत्पादन मिळते. तसेच माती परीक्षण आणि त्यानुसार पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर ते करतात.
अभिषेक जैन हे शेतीमध्ये कसे आले?
लहानपणापासून अभिषेक यांना शेतीमध्ये विशेष स्वारस्य नव्हते. परंतु जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांनी शेतीमध्ये काहीतरी करावे असा विचार केला व लिंबू शेतीचा सखोल अभ्यास करून एक नगदी पीक आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक असल्याचे त्यांना कळले.
सुरुवातीला यामध्ये देखील त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये पिकाची योग्य देखभाल करण्यापासून तर बाजारात योग्य दर मिळणे यामध्ये बऱ्याच समस्या आल्या. परंतु मेहनत आणि संयमाच्या जोरावर त्यांनी लिंबू शेतीमध्ये प्रभुत्व मिळवले आणि हळूहळू यशाच्या पायऱ्या चढत गेले.
अभिषेक जैन यांच्या लिंबू शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामुळे त्या परिसरातील अनेक शेतकरी आता लिंबू शेतीकडे आकर्षित झाले असून अगोदर जे शेतकरी पारंपारिक पिकांवर अवलंबून होते ते आता नगदी पिकांचे फायदे समजू लागले आहेत.
अभिषेकच्या शेतीला जे शेतकरी भेट देतात ते त्यांच्या पद्धतीने प्रेरित होतात व त्यांच्याकडून लिंबू शेतीच्या महत्वाचे नियोजनाच्या पद्धती व ते कोणत्या पद्धतीने त्यांच्या शेतामध्ये नियोजन करतात हे समजून घेऊन त्यांच्या शेतामध्ये देखील तसा अवलंब करतात.अशा पद्धतीने अभिषेक जैन यांचा प्रवास हा शेतकऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी असा आहे.