Home Care Tips:- घरातील स्वच्छता ही घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते व घराच्या सुंदरतेसाठी देखील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण असतं. त्यामुळे घराची स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असते.
घराची स्वच्छता ठेवण्यामध्ये जर आपण बघितले तर घरातील फरशी पुसणे हे देखील यामध्ये महत्त्वाचे काम असते व बरेच जण दररोज घरातील फरशी पुसतात. यामुळे फरशी तर स्वच्छ दिसते परंतु काही केल्या घरातील मुंग्या तसेच झुरळे आणि पाली यांचा अटकाव मात्र होत नाही.
झुरळ व पालींच्या नियंत्रणासाठी अनेक प्रकारची रासायनिक उत्पादने सध्या बाजारात मिळतात व त्यांचा वापर केला जातो. परंतु अशी रासायनिक उत्पादने हे केमिकल मिश्रित असल्याने ते आरोग्याला हानिकारक ठरतात. या ऐवजी जर तुम्ही घरातील काही नैसर्गिक उपायांचा वापर केला तर झुरळ आणि मुंग्या तसेच पाली इत्यादींचा सहजपणे प्रतिबंध करता येतो.
पाण्यामध्ये या पदार्थांचा वापर करा व घराची फरशी पुसा किंवा ते पाणी फवारा
1- पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण- व्हिनेगर झुरळांच्या नियंत्रणासाठी एक सर्वात मोठा उपाय असून विनेगर मध्ये असलेल्या अँटिबॅक्टेरियल गुणधर्मामुळे घरापासून झुरळ दूर होतात.
यामध्ये एक लिटर पाण्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळून घ्यावे. त्याच्यानंतर हे मिश्रण फडक्याने किंवा स्प्रे बॉटलच्या मदतीने घरातील लादीवर फवारावे किंवा घरातील फरशी किंवा लादी पुसताना या मिश्रणाचा वापर जर केला तर घरामध्ये झुरळ येत नाही.
2- पाणी आणि कडूलिंबाचा रस- कडुलिंबाचा रस हा अँटिबॅक्टरियल गुणधर्मांनी युक्त असून एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून देखील प्रसिद्ध आहे. याचा वापर करण्यासाठी दोन लिटर पाण्यात दोन चमचे कडू लिंबाचा रस मिसळून घ्यावा व या मिश्रणामध्ये फडके बुडवून त्या फडक्याने फरशी पुसावी. त्यामुळे देखील झुरळे पटकन घराच्या बाहेर जातात व घरामध्ये परत येत नाही.
3- पाणी आणि टी ट्री ऑइल- टी ट्री ऑइल देखील नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्मांनी परिपूर्ण असून याचा वापर करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये काही थेंब टी ट्री ऑइल टाकून ते मिसळून घ्यावे व हे मिश्रण स्प्रे बाटलीमध्ये भरून स्वयंपाक घर, बाथरूम किंवा झुरळ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हे मिश्रण फवारावे. त्यामुळे घरात झुरळ वगैरे कीटक येत नाही.
4- बेकिंग सोडा आणि साखरेचे मिश्रण- बेकिंग सोडा आणि साखर यांचा वापर देखील झुरळांचा प्रभावी नायनाट करू शकतो. याचा वापर करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि एक टेबलस्पून साखर एकत्र करून ते मिश्रण झुरळ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी फवारावे. त्यामुळे साखर खाण्याकरिता झुरळ येतात आणि त्यासोबत बेकिंग सोडा देखील त्यांच्या पोटात जातो. हे मिश्रण झुरळांच्या शरीरासाठी विषारी ठरते व ते हळूहळू कमी होतात.
5- पाणी आणि निलगिरी तेल- निलगिरी तेलाच्या वासामुळे देखील झुरळ घरात येत नाही. निलगिरी तेलाचा वापर करण्याकरिता एक लिटर पाण्यात दहा ते बारा थेंब निलगिरी तेल मिसळून घ्यावे व या मिश्रणात फडके बुडवून फरशी पुसून घ्यावी. यामध्ये असलेले निलगिरी तेल झुरळांना अत्यंत त्रासदायक ठरते व त्यामुळे झुरळ घर सोडून जातात व पुन्हा येत नाहीत.
6- काळी मिरी पावडर आणि पाणी- फरशी पुसण्याच्या पाण्यात मसाल्यातील काळीमिरी घ्यावी व ती बारीक कुटून ती पावडर पाण्यामध्ये घालावी व त्या पाण्याने फरशी पुसावी.काळी मिरीला तीव्र वास असतो व या वासामुळे झुरळ तसेच मुंग्या, पाली व उंदीर पळतात व घर स्वच्छ राहते.