Government Land Measuring Rate:- जमिनीच्या संदर्भात जर बघितले तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे वाद शेतकऱ्यांमध्ये दिसून येतात. यातील प्रमुख वाद हे बांधावरून असतात म्हणजेच आपल्या शेतजमिनीवर शेजारच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले आहे यासंदर्भातील वाद मोठ्या प्रमाणावर दिसून येतात व दुसऱ्या प्रकारचा वाद हा शेत रस्त्याच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो.
जमिनीच्या हद्दबाबत असलेले वाद जर बघितले तर हे मिटवण्यासाठी जमिनीची मोजणी हा एक चांगला उपाय किंवा पर्याय आहे. जर कोणत्याही शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या हद्दीसंबंधी वाद असेल तर शेतकऱ्यांकडून जमिनीची शासकीय मोजणी आणली जाते व त्या माध्यमातून हा वाद सोडवला जातो.
परंतु आता शेतजमिनीची शासकीय मोजणी करणे देखील शेतकऱ्यांना आता आर्थिक दृष्टिकोनातून फटका देणारे ठरणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आता जमीन मोजणीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना या निर्णयामुळे खूप मोठा फटका बसणार आहे.
अगोदर असलेल्या दरांपेक्षा जास्त दर वाढ झाल्यामुळे आता जास्तीचा पैसा शेतकऱ्यांना जमीन मोजणी करता द्यावा लागणार आहे. साधारणपणे जमीन आणि प्लॉट यांच्या मोजणी करता लागणाऱ्या पैशांमध्ये शासनाच्या माध्यमातून जवळपास सरासरी दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. जमीन मोजणीच्या संदर्भात जे काही नवीन दर ठरवण्यात आलेले आहेत त्यांची अंमलबजावणी आता या महिन्यापासून होणार आहे.
दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर किती पैसे द्यावे लागतील?
समजा दोन हेक्टरपर्यंत जमिनीची साधी मोजणी करायची आहे तर त्याकरिता दोन हजार रुपये आणि दोन हेक्टरवर पुन्हा दोन हेक्टर जमिनीची मोजणी करायची असेल तर पुन्हा दोन हजार रुपये अशाप्रकारे आता दर आकारला जाणार आहे.
दोन हेक्टर पेक्षा जर कमी जमीन असेल तर एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. असेच प्रमाण हे जलद गती मोजणीसाठी देखील आहे.
साधारणपणे जमिनीच्या मोजणीच्या दरांसाठी साधी मोजणी असेल तर अगोदर एक हजार रुपये व जलदगती मोजणीसाठी तीन हजार रुपये द्यावे लागत होते. परंतु आता नवीन दरानुसार साधी मोजणी करिता दोन हजार रुपये आणि जलद गती मोजणी करिता आठ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
व्यावसायिक भूखंड मोजणीसाठी किती पैसे द्यावे लागतील?
एक सर्वे नंबर किंवा गट नंबर, पोट हिस्से, प्लॉट तसेच मंजूर रेखांकनातील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत अगोदर एक हजार रुपये इतके शुल्क हे साध्या मोजणीसाठी आणि अति तातडीच्या गोष्टीसाठी तीन हजार रुपये शुल्क भरावे लागत होते. परंतु आता साधी मोजणी करिता 3000 रुपये भरावे लागतील व अति तातडीच्या मोजणी करिता 12000 रुपये मोजावे लागणार आहेत.
महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील भूखंडाच्या मोजणीसाठी किती पैसे द्यावे लागतील?
महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील भूखंडाच्या मोजणीकरिता अगोदर 2000 आणि जलद गती मोजणीकरिता सहा हजार रुपये इतके शुल्क आकारले जात होते. परंतु आता नवीन दरानुसार साध्या मोजणीकरिता 3000 रुपये आणि जलद गती मोजणीकरिता बारा हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
मोजणीचे आता फक्त आहेत दोनच प्रकार
अगोदर जमीन मोजणीचे साधी, तातडीची आणि अतितातडीची असे तीन प्रकार होते. परंतु आता बदलानुसार जमीन मोजणीचे फक्त साधी आणि जलद गती असे दोनच प्रकार करण्यात आलेले आहेत.