Petrol And Diesel Price : गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशातील इन्फ्लेशन रेट म्हणजेच महागाईचा दर हा विक्रमी पातळीवर पोहोचला असून याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय.
खाद्यतेल, डाळी, भाजीपाला, कांदा, एलपीजी गॅस सिलेंडर, सीएनजीच्या किमती गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढतील अशी बातमी समोर येत आहे.
यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी कात्री बसणार आहे. सध्या मध्यपूर्व देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. याचं तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि इराण या देशांवर युरोपियन युनियनने मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत.
याचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या पुरवठावर मोठ्या प्रमाणात ताण पडत असून पुरवठा विस्कळीत होत असल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा तुटवडा देखील जाणवू शकतो अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
महत्वाचे म्हणजे कच्च्या तेलाचा तुटवडा पडणार ही भीती पाहता गेल्या पाच ते सहा दिवसांच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, बाजारातील अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे जर अशीच परिस्थिती आगामी काही दिवस कायम राहील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्यात तर याचा परिणाम आपल्या भारतातही पाहायला मिळणार आहे.
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. क्रूड ऑइल चा पुरवठा कमी झाला असल्याने आणि अमेरिकेने व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याने कच्च्या तेलाची खरेदी वाढली आहे आणि याचाच परिणाम म्हणून याच्या किमती सुद्धा वाढत आहेत.
विशेष असे की तज्ञांनी आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती अजून वाढू शकतात असे म्हटले आहे. दुसरीकडे चीनकडून कच्च्या तेलाची आयात वाढली आहे. आगामी काळात चीनमध्ये कच्च्या तेलाची आयात आणखी वाढणारच असे दिसते.
यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढतील असे म्हटले जात असून याचा परिणाम म्हणून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी महागण्याची शक्यता आहे.
साहजिकच याचा फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात जर कच्च्या तेलाच्या किमती वाढून पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली तर सर्वसामान्यांना दुहेरी आर्थिक भूृदंड या ठिकाणी बसणार आहे.