Electric Highway In India:- कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशामध्ये वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा कशा प्रकारच्या आहेत यावर प्रामुख्याने अवलंबून असते. त्यामुळे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही देशांमध्ये रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांसाठी वाहतूक व दळणवळणाचे महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारले जाणे खूप गरजेचे असते.
जर गेल्या काही वर्षांपासूनचा विचार केला तर भारतामध्ये अनेक ठिकाणी म्हणजेच अनेक राज्यांमध्ये मोठमोठे महामार्गांचे काम सुरू करण्यात आले आहे व काही मार्गांचे काम पूर्णत्वास आले असल्याने संपूर्ण भारतामध्ये महामार्गांचे एक मोठे नेटवर्क तयार होण्यास मदत झाली आहे.
यामुळे कृषी आणि औद्योगिक विकासाला तर चालना मिळतेच परंतु जलद वाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील या महामार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. जर आपण सध्या भारतातील एक महत्त्वाचा एक्सप्रेस वे बघितला तर तो दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आहे. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग असून त्याची एकूण लांबी 1350 किलोमीटर आहे.
भारतातील प्रमुख सहा राज्य या एक्स्प्रेस वे ने जोडले जाणार असल्याने नक्कीच या सहा राज्यांचा विकास होण्यामध्ये हा एक्सप्रेसवे खूप महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे.
इतकेच नाही तर भविष्यामध्ये या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चापासून मुक्तता होण्यास देखील मदत होणार आहे व यामागील प्रमुख कारण म्हणजे या एक्सप्रेस वे वर इलेक्ट्रिक हायवेचे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच या इलेक्ट्रिक हायवेवरून जेव्हा वाहने प्रवास करतील तेव्हा ती विजेवर धावतील प्रवासादरम्यान ते चार्ज होतील.
कसा असेल हा इलेक्ट्रिक हायवे?
देशातील 1350 किलोमीटर लांबीचा असलेला दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातून सुरू होतो व याच एक्सप्रेसवर इलेक्ट्रिक हायवेची उभारणी केली जाणार आहे व यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चापासून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे. कारण जेव्हा इलेक्ट्रिक हायवे वरून वाहने धावतील तेव्हा ते विजेवर चालतील आणि प्रवासादरम्यान चार्ज होतील.
या हायवेवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केला जात असून या मार्गिकांवरून ट्रक तसेच ट्रॉलीबस यासारखी वाहने देखील धावतील व ट्रेन प्रमाणे ते विजेवर चालतील.जेव्हा या इलेक्ट्रिक हायवेची निर्मिती केली जाईल तेव्हा पेट्रोल आणि डिझेल ऐवजी विजेचा वापर केला जाणार असल्याने एकूण लॉजिस्टिक खर्च 70% कमी होईल असा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जर आपण मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवे बघितला तर हा एकूण आठ लेनचा आहे व या एक्सप्रेसच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक लेन इलेक्ट्रिक वाहनांसाठी राखीव असणार आहे. तसेच सुरक्षिततेसाठी या एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना दीड मीटर उंचीचे अडथळे उभारले जाणार आहेत.देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच या इलेक्ट्रिक हायवेची घोषणा केली होती.
जगाच्या पटलावर विचार केला तर सध्या अशा प्रकारचे इलेक्ट्रिक हायवे जर्मनी आणि स्वीडन या ठिकाणी आहेत. त्याच धर्तीवर आता भारतात दिल्ली- मुंबई या एक्सप्रेस वे वर दिल्ली ते जयपूर दरम्यानचा जो या एक्सप्रेसवेचा भाग आहे तो इलेक्ट्रिक हायवे प्रमाणे विकसित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.