Rent Agreement Rule:- मोठे शहर असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी बऱ्याचदा भाडेतत्त्वावर घरे दिली जातात. अशा प्रकारे फ्लॅट किंवा घर भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण आपल्याला शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामधील प्रमुख कारण बघितले तर शहरी भागांमध्ये व्यवसाय किंवा कामानिमित्त ग्रामीण भाग किंवा इतर भागातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात व राहण्यासाठी एखादा फ्लॅट किंवा घर भाड्याने घेऊन राहतात.
साहजिकच अशा पद्धतीने जेव्हा घर भाड्याने एखाद्या व्यक्तीला दिले जाते तेव्हा आयुष्यातील समस्या टाळण्याकरिता भाडे करार केला जातो. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या जातात व हा भाडेकरार साधारणपणे 11 महिन्याचा असतो.
परंतु या भाडेकराराच्या व्यतिरिक्त आणखी एक बाब आवश्यक असून ती देखील करून घेणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला घर किंवा फ्लॅट भाड्याने देतो. परंतु ती व्यक्ती नको त्या बेकायदेशीर गोष्टींमध्ये अडकलेली असू शकते व तसे जर झाले तर मात्र उगाच तुम्हाला देखील मानसिक त्रास यामुळे होऊ शकतो.
घर भाड्याने देण्याआधी भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक
समजा तुम्ही एखादे घर किंवा जमीन किंवा दुकान एखाद्या व्यक्तीला भाडतत्त्वावर देत असाल तर त्या अगोदर भाडेकरार करणे आणि त्या संबंधित भाडेकरूची पडताळणी म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपण एखादी मालमत्ता भाड्याने देतो तेव्हा त्या अगोदर भाडेकरार गरजेचा आहे.
अगदी त्याच पद्धतीने पोलीस वेरिफिकेशन देखील आता खूप महत्त्वाचे असते. परंतु आपल्याला असे दिसून येते की,लोक जेव्हा एखादी मालमत्ता भाड्याने देतात व भाडेकरार करण्याकडे जातीने लक्ष देतात. परंतु त्याऐवजी मात्र पोलीस व्हेरिफिकेशन अर्थात पडताळणीकडे मात्र दुर्लक्ष करतात.
त्यामुळे काही प्रकरणात नको ते परिणाम यामुळे भोगावे लागू शकतात. समजा तुम्ही एखाद्याला तुमचे घर किंवा फ्लॅट किंवा जमीन भाड्याने दिली व भविष्यामध्ये एखाद्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये जर संबंधित भाडेकरू असल्याचे उघड झाले तर मात्र घरमालकावर कायदेशीर कारवाईचा धोका यामुळे निर्माण होतो.
त्यामुळे पोलीस पडताळणीचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित होते. जर आपण याबाबतीत Housing.com चा अहवाल पाहिला तर त्यानुसार भाडेकरूंच्या पोलीस पडताळणीला अतिशय महत्त्व आहे. एखाद्या भाडेकरूने जर घरात किंवा दुकानांमध्ये काही बेकायदेशीर कृत्य केले तर त्याला घरमालक जबाबदार असेल.
त्यामुळे भाडेकरूला घर किंवा जमीन भाडेतत्त्वावर देणे अगोदर संबंधित भाडेकरूची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती हे घर मालकाने मिळवणे गरजेचे आहे व ती घर मालकाची जबाबदारी आहे. संबंधित भाडेकरुची सर्व माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करणे गरजेचे आहे.
आता पोलीस पडताळणी अनिवार्य आहे. देशातील अनेक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी भाडेकरूंची पोलीस पडताळणी अनिवार्य केली आहे. भाडे करूनही जर कोणताही गुन्हा केलेला असेल किंवा चुकीचे कृत्य केलेले असेल तर
अशा प्रकरणावर घरमालकार गुन्हा दाखल करण्याची तरतूद भारतीय दंड संहितेमध्ये असून यानुसार तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची शक्यता असते. तसेच इतर प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे गांभीर्य पाहून शिक्षेची तरतूद आहे.
भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन कसे करावे?
पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये भाडेकरू पडताळणी फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील.
याकरिता पोलीस विभागाच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी आणि भाडेकरू पडताळणी फॉर्म डाऊनलोड करावा. या फॉर्ममध्ये भाडेकरूचा संपूर्ण तपशील व त्यासोबत तुमची संपूर्ण मूलभूत माहिती नमूद करावी.
ही सगळी माहिती नमूद केल्यानंतर त्या वेबसाईटवरच हा ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा. तसेच तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देऊन देखील याबाबतचा फॉर्म भरू शकतात.