Ahilyanagar Politics:- नुकतेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले व अधिवेशन संपण्याच्या आधी खाते वाटप करण्यात आले. जर आपण करण्यात आलेल्या या खाते वाटपाचे स्वरूप बघितले तर यामध्ये अनेक दिग्गजांना धक्का देण्यात आला व अनेक महत्त्वाचे खाती ही अशा आमदारांना मिळाली की ते कोणाच्या मनात देखील नव्हते.
असाच काहीसा प्रकार माजी महसूल मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील बडे नेते म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीत घडला. विखे यांनी महसूल खाते मिळावी याकरिता जोरदार लॉबिंग करण्याचे प्रयत्न केले.परंतु तरी देखील ते अयशस्वी ठरले व शेवटी फडणवीस यांनी महसूल खात्याची माळ ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यात टाकली.
वास्तविक पाहता अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल दहा विधानसभा मतदारसंघांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला व याचे सगळे श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांना जाते.
इतकेच नाहीतर अहिल्यानगर जिल्ह्यामधून बाळासाहेब थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ आणि काँग्रेसचे दिग्गज नेत्याचा पराभव करण्यामागे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिकाच महत्त्वाची ठरली.
परंतु असे असताना देखील त्यांचे पंख छाटण्यात आले व महसूल मंत्री पद राधाकृष्ण विखे पाटील यांना न देता ते बावनकुळे यांच्याकडे देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला. यामागे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कुठले प्लस पॉईंट आहेत किंवा का त्याच्याकडे महसूल मंत्री पद आले? हे देखील पाहणे यामध्ये महत्त्वाचे आहे.
महसूल मंत्री पदासाठी फडणवीसांची पसंती बावनकुळे यांनाच का?
2019 ची विधानसभा निवडणूक पाहिली तर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली होती.परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुठल्याही प्रकारचे आदळ आपट न करता शांतपणे पक्ष देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायला पसंती दिली व त्या पद्धतीने काम करत राहिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर भाजपमध्ये दोन नंबरचे खाते आणि नेते होण्याचा मान त्यांना मिळाला. तसे पाहायला गेले तर महसूल खाते मिळावे याकरिता भाजपमध्येच अनेक नेते इच्छुक होते.
त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अग्रस्थानी होते. त्यांनी त्यांची ताकद वापरून दिल्लीत देखील लॉबीग केली. परंतु तरीदेखील पक्षासाठी झोकून काम केलेले विश्वासू चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रीपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
राज्यामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाने जोर पकडला होता व यावेळी फडणवीस यांना प्रामुख्याने टार्गेट करण्यात येत होते असे असताना देखील ओबीसी चेहरा असलेले बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने बाजू घेतली होती व बाजू लावून धरली.
तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून जेव्हा त्यांनी काम केले तेव्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत हा त्यांचा आग्रह व इच्छा देखील होती तसेच पक्षासाठी झोकून देऊन आपल्याला काम करायचे आहे असे सांगून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्याचे काम त्यांनी केले. तसेच नागपूरची जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांवर देखील बावनकुळे आणि फडणवीस यांनी दोघं मिळून काम केले.
तसेच निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री निवडताना धक्कातंत्र वापरले जाईल अशी अनेक नेत्यांमध्ये चर्चा होती व त्यावेळी देखील बावनकुळे हे फडणवीस मुख्यमंत्री होतील असे जाहीरपणे देखील सांगत होते.
तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट 2019 मध्ये जेव्हा नाकारण्यात आले होते तरी देखील धीर न सोडता अतिशय संयमीपणे काम केले व त्याचेच फळ त्यांना आता मिळाले. महसूल मंत्री पद मिळाल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे सरकारमधील चार नंबरचे आणि भाजप मधील दोन नंबरचे नेते बनले आहेत.
पहिल्यांदा जलसंपदा खात्याचे दोन खात्यात रूपांतर
जलसंपदा या खात्याचे यावर्षी प्रथमच दोन खात्यामध्ये रूपांतर करण्यात आले. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे ही खाती देण्यात आले आहेत.
यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मराठवाड्यात गोदावरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोरे देण्यात आले तर विदर्भ,उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील विभाग हा गिरीश महाजन यांच्याकडे असणार आहे.
विखे यांची महसूल मंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग तरीही ठरले अयशस्वी
राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याकरिता दिल्लीमध्ये त्यांचे वजन वापरून लॉबिंग करण्याचे प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी ठरले. दिल्लीमध्ये असलेले त्यांचे सगळे राजकीय वजन वापरून त्यांनी तसे प्रयत्न सुरू केलेलेच होते.
परंतु तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री पद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले. राधाकृष्ण विखे पाटील यांची दिल्ली दरबारी चलती असताना देखील राज्यात फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच महसूल मंत्री पद देण्याला प्राधान्य दिले व शेवटी राधाकृष्ण विखे पाटील यांची महसूल मंत्री पदासाठीचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.